जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक
भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यकर्ता आणि मजबूत संघटनात्मक बांधणीवर अग्रेसर राहिलेली आहे. सत्तेच्या प्रवाहात असताना अनेक जण आले आणि निघूनही गेले परंतु जे कधी भारतीय जनता पार्टीचे झालेच नाही, ज्यांना कधी संघटना समजलीच नाही अशा सत्तालोभी व्यक्तींच्या येण्याने अथवा जाण्याने भाजपला कोणताही फरक पडणार नसल्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण पश्चिम पदाधिकारी कार्यकारणीची बैठक गुरुवारी भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाटील बोलत होते.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, संघटनेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीची 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्ता आली. त्यामुळे निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुका, बूथ स्तरावर एकदिलाने भाजपाचे संघटनात्मक कार्य जोमाने करणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्षांना दिला. यावेळी भाजपच्या सदस्यता अभियानाचा प्रारंभ विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी देशपांडे यांनी संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव बुवा, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, हंबीरराव पाटील, राजेंद्र तारळे, वसंतराव प्रभावळे, प्रा. राजेंद्र ठाकूर, प्रा. धनाजी मोरस्कर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.