संघाचे सर-कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन : देशात 20 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील वाढती बेरोजगारी, गरीबी आणि उत्पन्नातील वाढत्या विषमतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर-कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये अनेक पावले उचलण्यात आली असल्याचे होसबाळे यांनी म्हटले आहे. ते संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाकडून आयोजित एका वेबिनारमध्ये सामील झाले होते.
भारताच्या एक टक्के लोकसंख्येकडे देशाच्या उत्पन्नाचा पाचवा (20 टक्के) हिस्सा आहे. तर देशाच्या 50 टक्के लोकसंख्येकडे देशाच्या उत्पन्नाचा केवळ 13 टक्के हिस्सा आहे. उर्वरित 50 टक्के लोकांकडे 87 टक्के उत्पन्न असून ही स्थिती योग्य नसल्याचे होसबाळे म्हणाले.
20 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली जगत आहेत आणि 23 कोटी लोक प्रतिदिन 375 रुपयांपेक्षा कमी कमावत असल्याचे दुःख आम्हाला असायला हवे. दारिद्रय़ाचे आमच्यासमोर राक्षसासारखे आव्हान आहे. या राक्षसाचा नायनाट करणे अत्यंत गरजेचे असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
गरीबीसह विषमता आणि बेरोजगारी या दोन आव्हानांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. देशात 4 कोटी बेरोजगार असून यातील 2.2 कोटी ग्रामीण क्षेत्रांमध्ये तर 1.8 कोटी बेरोजगार शहरी क्षेत्रांमधील आहेत. मनुष्यबळ सर्वेक्षणात बेरोजगारीचे प्रमाण 7.6 टक्के नमूद करण्यात आले आहे. रोजगारनिर्मितीसाठी केंद्रीय स्तरावर नव्हे तर स्थानिक स्तरावरही योजना आखण्याची गरज आहे. कृषी, कौशल्य विकास, विपणन इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करता येऊ शकते. आमच्या कुटीर उद्योगांना उर्जितावस्था दिली जाऊ शकते. स्वयंरोजगार आणि उद्योजकतेत स्वारस्य असलेल्या लोकांचा शोध घेतला पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थी नोकरी शोधत राहिले तर एवढे रोजगार निर्माण होऊ शकत नाहीत. नोकरी मागणाऱयांना रोजगारदाते बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणतेही काम महत्त्वाचे असते हे समाजानेही समजून घेण्याची गरज आहे. बागकाम करणाऱयाला योग्य मान मिळत नसल्यास ते करायची कुणाची इच्छा होणार नाही. आपल्याला मानसिकता बदलावी लागणार असल्याचे सरकार्यवाह होसबाळे यांनी म्हटले आहे.
देशातील मोठय़ा हिस्स्याला अद्याप स्वच्छ पेयजल अन् भोजन मिळत नाही. शिक्षणाची दर्जाहीन पातळी देखील गरीबीचे एक कारण आहे. याचमुळे नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचबरोबर हवामान बदल देखील गरीबीस कारणीभूत ठरत आहे. तर अनेक ठिकाणी सरकारचे अपयश गरीबीचे कारण असल्याचे ते म्हणाले.









