शेतकरी महासंघाचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची मागणी
वार्ताहर/ कुडाळ
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायाला काही लोक अतिक्रमण करून कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात यापूर्वी दोन- तीन ठिकाणी गुरांचा बाजार भरत होता. त्यावेळी ही जनावरे पायी चालवित आणली जात होती. कालांतराने ही जनावरे वाहतूक मार्गाने जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात पाठविली जात आहेत. परंतु मध्यतंरीच्या काळात काही चुकीच्या गोष्टीमुळे गैरसमजातून ही जनावरे कत्तलीसाठी पाठविली जातात अशा गैरसमजातून जनावरांच्या वाहतूकीवर कारवाई केली जात आहे. गुरांच्या वाहतूकीचा विषय सध्या ऐरणीवर आहे. आज शेतकऱ्यांना कुठेतरी पाठबळ मिळणे आवश्यक आहे. परंतु कायद्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांना त्रास दिला जात आहे. असे सांगत शेतकऱ्यांच्या शेती विषयक मागण्यांना शासनाने कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकरी महासंघाचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी शनिवारी येथे केली. शेतकरी संघटना आणि शेतीपूरक व्यवसायावर आधारित शेतकरी सिंधुदुर्ग शेतकरी महासंघाचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरटीओ यांनाही निवेदन देण्यात आली आहेत. असेही त्यांनी सांगितले.यावेळी रुपेश पावसकर, अझीम शेख,अस्लम खुल्ली, अभिषेक वाटवे, चेतन आळवे, नारायण शिरसाट,तलीम शेख आदी शेतकरी उपस्थित होते.
श्री. प्रभूगावकर म्हणाले, अलीकडे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची आणि शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या सर्वपक्षीय बैठकीत मांडल्या होत्या. त्यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे सर्वपक्षीयांनी आश्वासन दिले आहे.आपल्याकडील शेती ही तुकडा पद्धतीची आहे. त्यामुळे ही शेती यांत्रिक पद्धतीने करणे शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळे शेतकरी शेतीपासून दूर होत चालले आहेत. तुकडा पद्धतीने शेती करणाऱ्या शेतीला लागणारी जनावरे ही परजिह्यातून आणावी लागतात.त्यामुळे जनावरांची देवघेव ही या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात अशी सुरु असते. परंतु ही जनावरे कत्तलखान्यात जातात. अशा गैरसमजूतीतून ही जनावरे काही ठिकाणी उतरून घेऊन कारवाई करतात. परंतु पुढे या जनावरांचे काय केले जाते. याचा पत्ताच लागला जात नाही. अलीकडे काही दिवसांपूर्वी कुडाळ पोलीस्टेशनमध्ये अशाच प्रकारची जनावरे उतरून कारवाई करण्यात आली होती. काल मालवण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अशीच जनावरे पकडली गेली.यात दोन बैल , एक गाबण म्हैस होती. मात्र ही जनावरे कत्तलीसाठी जात आहेत. अशा गैरसमजातून चुकीच्या माहितीने पकडली गेली. त्यासंदर्भातत पोलिसांकडून माहिती घेण्यात आली. तेव्हा समजले की प्रत्यक्ष ही जनावरे कत्तलीसाठी पकडली नसून चटई क्षेत्रानुसार ही जनावरे गाडीत जास्त भरली गेली असे पोलीस खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्याचा कुठलाही राजकीय पक्ष नाही. शेतकरी हा सर्वपक्षीय आहे. सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यात येतात. त्याच्यामध्ये कुठलेही राजकारण येत नाही. आज शेतकऱ्यांना कुठेतरी पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कोरोना काळात सगळे व्यवहार ठप्प झाले होते. परंतु त्यावेळी शेतकरी थांबला असता तर भूतलावरची मनुष्यवस्ती संपली असती.परंतु शेतकऱ्यांच्या शेतीच्या जनावरांच्या बाबतीत चुकीचे अर्थ लावले जात आहेत. या जिल्ह्यात कुठेही कत्तलखाना नाही. ही जनावरे कत्तलीसाठी जातात, हे कोणाच्या आधारे ठरविले जाते. याचे आकलन शेतकऱ्यांना झालेले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. शेतकरी पावसाळी हंगामात जनावरे विकत घेतात. शेती हंगामा झाल्यावर ही जनावरे पुन्हा विकतात. कारण वर्षभर जनावरे पाळणे त्यांना शक्य नसते. जिल्ह्यात दुध उत्पादन फार कमी आहे. दुध उत्पादित करायचे असेल तर अडीच लाख दूधउत्पादन होणे अपेक्षित आहे. सध्या जिल्ह्यात फक्त 70 ते 80 हजार लिटर दुध उत्पादीत केले जाते. जर दुध उत्पादनासाठी चांगल्या प्रकारची जनावरे आणायची असतील तर वाहतूकीचा प्रश्न वारंवार येतच राहणार आहे. पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांचा विषय ऐरणीवर धरला आहे. त्याप्रमाणे इतही अवैध विषय समाजात घडत आहे. त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.आज जिल्ह्यात कितीतरी अवैध विषय घडत आहेत. त्याकडे मात्र दुर्लक्ष केला जात आहे. असे शेतकऱ्यांना आता वाटू लागले आहे. कायदा आणि सुव्यवस्था मानणारा शेतकरी आहे. कायद्याप्रमाणे कारवाई होणे आवश्यक आहे. त्याबद्दल आमचे दुमत नाही. परंतु कायद्याची सांगड इथल्या भौगोलिक परिस्थितीशी व्यावहारिक दृष्टीकोनातून घातली जावी, आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे. असे त्यांनी सांगितले.
कुडाळ शहरात बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपंचायतीने परवानगी दिली आहे. याबाबत नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे लवकरच कुडाळात बैल बाजार सुरू होणार असून, याबद्दल न.पं. आणि नगरसेवक विलास कुडाळकर यांचे शेतकऱ्यांच्या वतीने प्रभुगावकर यांनी आभार मानले.









