ओबीसी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पर्वरी : गोव्यातील एसटी समाजाच्या मागणीचा विचार करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या आयोगाकडेच गोव्यातील ओबीसींची मागणी सोपविण्यात यावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोवा अध्यक्ष मधू नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या निवेदनावर ओबीसी समाजाच्या 19 ही संघटनांनी सहया केल्या आहेत. गोव्यात ओबीसी समाजांचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा अधिक असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही 27 टक्केच जागा मागत आहोत. सरकारने आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी नाईक यांनी केली. गोव्यातील एसटी समाजाच्या मागणीनुसार 4 राखीव जागा निश्चित करण्यासाठी पुनर्रचना आयोग नेमण्याचे आश्वासन केंद्र सरकारने गोवा सरकारला दिले आहे. आता गोव्यातील ओबीसींचीही तशीच मागणी आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गोवा सरकारकडे केलेल्या वेगवेगळ्या मागण्या दीर्घकाळ पडून आहेत. क्रीमी लेयरची उत्पन्न मर्यादा 8 लाखावऊन 15 लाख करावी, ही मागणी त्वरित मान्य करावी, असे आवाहन मधू नाईक यांनी केले. दक्षिण गोव्यात होऊ घातलेले नवे वैद्यकीय महाविद्यालय खासगी क्षेत्राऐवजी सरकारने चालू करावे अशी मागणी मधू नाईक यांनी केली. या पत्रकार परिषदेला भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, खजिनदार जोगुसो नाईक, खारवी समाजाचे अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर, सरचिटणीस रोशन चोडणकर, ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सर्वेश बांदोडकर, सल्लागार गुऊदास सावळ आदी उपस्थित होते.









