आजपर्यंत कुणीच मोजू शकले नाही खोली
पृथ्वी असंख्य रहस्यांनी व्यापलेली असून दररोज पृथ्वीविषयी नवी माहिती समोर येत असते. अनेकदा चकित करणारे जीव प्रथमच समोर येत असतात. आता जगातील सर्वात खोल ठिकाणाविषयी माहिती चर्चेत आली आहे. हे सर्वात खोल ठिकाण समुद्रात आहे. वैज्ञानिक याच्या पूर्ण खोलवर जाण्यास अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत.
वैज्ञानिकांनी याला चॅलेंजर डीप नाव दिले आहे. याच्या पूर्ण खोलीचा शोध घेण्यास अद्याप मोठा काळ लागू शकतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. प्रशांत महासागराच्या खाली मारियाना ट्रेंच्या दक्षिण टोकाला हे चॅलेंजर डीप मिळाले आहे. हे जवळपास 36 हजार फूट खोल आहे. वैज्ञानिकांनी याच्या खोलवर जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु प्रत्येकवेळी यात अपयश आले आहे.
अत्यंत काळोखात चॅलेंजर डीप
प्रशांत महासागरातील चॅलेंजर डीपमध्ये अत्यंत काळोख असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. पृथ्वीवरील या सर्वात खोल ठिकाणी जीवन आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. समुद्रात प्रकाश असलेल्या ठिकाणीच बहुतांश सागरी जीव राहत असतात. परंतु चॅलेंजर डीपमध्ये पूर्ण काळोख आहे. या काळोखामुळेच माणसालाही तेथे पोहोचण्यास अवघड ठरत असते.
चॅलेंजर डीपविषयी वैज्ञानिकांनी सर्वप्रथम 1875 मध्ये कळले होते. परंतु 1951 मध्ये पहिल्यांदा याची खोली मोजण्याचा प्रयत्न झाला. तेथे पाण्याचा दबाव पृष्ठभागाच्या दबावापेक्षा सुमारे 1 हजार पट अधिक असतो. 1960 मध्ये पहिल्यांदा जॅक पिकार्ड आणि डॉन वॉल्श यांनी येथे पोहोचण्यास यश मिळविले होते. यानंतर 2012 मध्ये जेम्स कॅमेरून डीपसी चॅलेंजर पाणबुडीच्या मदतीने तेथे पोहोचले होते. परुंत याच्या अत्यंत खोल ठिकाणी पोहोचणे आजही कठिण आहे.









