कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले चित्र : प्रतिस्पर्ध्यांना गोलंदाजीची कल्पना येऊ नये हा हेतू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिभावान चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीच्या संघातून का वगळण्यात आले आहे त्यावर प्रकाश टाकताना हा धोरणात्मक निर्णय असल्याचे संकेत दिले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकापूर्वी विरोधी फलंदाजांना कुलदीपला सामोरे जाण्याची संधी मिळू नये हा त्यामागील हेतू असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
कुलदीपचे प्रभावी फिरकी कौशल्य पूर्ण आशिया चषकादरम्यान दिसून येऊन त्यात त्याने केवळ 5 सामन्यांमध्ये एकूण 9 बळी 11.44 च्या सरासरीने घेतले. तथापि, भारताचा पहिला विश्वचषक सामना ऑस्ट्रेलियाविऊद्ध होणार असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापन त्यांचे पत्ते उघड करू इच्छित नाही आणि त्याचमुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रतिस्पर्ध्यांना कुलदीपच्या गोलंदाजीच्या शैलीची फारशी कल्पना येऊ द्यायची नाही अशी रणनीती त्यांनी आखली आहे.
कुलदीप हा असा गोलंदाज आहे की, ज्याला लय सापडल्यावर तो भरपूर फार्मात येतो, हे रोहितने कबूल केले आहे. मात्र त्याचबरोबर भरपूर विचारांती हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ‘आम्ही गेल्या दीड वर्षापासून कुलदीपला पाहत आहोत, त्यामुळेच आम्ही त्याला फारसे समोर आणू इच्छित नाही. तो शेवटच्या सामन्यात पुनरागमन करेल’, असे रोहित शर्माने सांगितले आहे. जे खेळाडू विश्वचषक संघाचा भाग आहेत आणि आशिया चषक स्पर्धेत केवळ एकाच सामन्यात खेळू शकलेले आहेत त्यांना संधी देणे महत्त्वाचे आहे, यावर त्याने भर दिला.
शिवाय शर्माने संघाच्या आगामी योजनांची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले, ‘विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीपूर्वी आम्ही दोन सराव सामने देखील खेळणार आहेत. त्यामुळे लय मिळविण्यासाठी कुलदीप त्यात परत येईल’. विश्वचषकात भारताचा जेव्हा ऑस्ट्रेलियाशी सामना होईल तेव्हा कुलदीप फॉर्ममध्ये राहून त्याच्या हातून सर्वोत्तम कामगिरी घडावी हा या धोरणात्मक दृष्टिकोनामागचा उद्देश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका 22 सप्टेंबरपासून पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीचा भारतीय संघ : के. एल. राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.









