नागपूर प्रतिनिधी
नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन महिन्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या कशा लढायच्या याचा पेच अद्यापही कायम आहे. कधी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहे तर कधी जिथे फायदा तिथे महायुती करू, असे सांगून थेट भूमिका भाजपने जाहीर केली नव्हती. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवू, अशा तीव्र भावना आपल्याकडे व्यक्त केल्या आहेत. त्या पाहता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर जिह्यात महायुती होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढल्यामुळे स्थानिक निवडणुकाही महायुती एकत्रच लढणार असल्याचे सुऊवातीला भाजपने जाहीर केले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना याचे अधिकार दिले आहे, त्यात वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाहीत, असेही भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच ठिकाणी युती होणार नाही, जिथे महायुतीचा फायदा होईल आणि महाविकास आघाडीला फायदा होणार नाही अशा ठिकाणी परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. वेगवेगळ्या भूमिकांमुळे महायुतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
भाजप स्वबळावर लढणार
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि जागावाटपाच्या बोलणीसाठी भाजपने पुढाकार घेतला नाही. आजपासून नगर पालिकाला, पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुऊवात देखील झाली. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बाबनकुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
सर्वांनाच स्वबळावर लढावे लागणार
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिक़ाऱ्यांना आपल्याला स्वबळावर लढायचे असल्याने तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिक़ाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेट घेतली. दोघांनी समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. भाजप नेत्यांकडून महायुतीबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. दुसरीकडे काँग्रेसतर्पेसुद्धा नागपूर ग्रामीणमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेसोबत आघाडीचे बोलणी टाळत आहे. हे बघता आता स्थानिकमध्ये सर्वांनाच स्वबळावर लढावे लागणार आहे.








