अद्यापही सापडत आहेत मृतदेह ः जगभरातून साहाय्याचा ओघ, तुर्कियेकडून भारताचे आभार
अंकारा / वृत्तसंस्था
तुर्किये (तुर्कस्तान) आणि सिरिया येथे प्रचंड विनाश घडवून आणलेल्या भूकंपातील मृतांची संख्या मंगळवारी 5 हजारांहून अधिक झाली आहे. हा भूकंप सोमवारी पहाटे झाला होता. अजूनही मृतदेह सापडत असून मृतांची प्रत्यक्ष संख्या कितीतरी अधिक असावी असे अनुमान व्यक्त होत आहे. किमान 25 हजार लोक जखमी झाले आहेत. या भूकंपात तुर्किये आणि सिरियामधील किमान 8 हजार इमारती धाराशायी झाल्या असल्याने अद्याप अनेक जणांचा पत्ता लागलेला नाही.
मृतांची मंगळवारी संध्याकाळपर्यंतची संख्या 5,100 इतकी आहे. त्यांच्यातही तुर्किये येथे सर्वाधिक हानी झाली. सांगितल्या गेलेल्या आकडय़ांपेक्षा ती बरीच अधिक असावी, असे अनुमान काढण्यात आले असून स्थानिक प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

भारताचे आभार
दुर्घटनेचे वृत्त समजताच भारताने प्रथम साहाय्यता पाठविण्याची योजना केली. त्यासाठी तेथील प्रशासनाने भारताचे आभार मानले. जो संकटावेळी धावून येतो तोच खरा मित्र, अशा शब्दांमध्ये तेथील प्रशासनाने भारताची प्रशंसा केली. भारताने आणखी साहाय्यता पाठविण्याचा शब्द दिला आहे.
सिरियात 850 बळी
सिरियात या भूकंपाने 850 जणांचे बळी घेतल्याची नोंद करण्यात आली. तसेच 5,000 ते 6,000 लोक जखमी झाल्याचीही माहिती देण्यात आली. पण अनधिकृत वृत्तांच्या अनुसार सिरियातील मृतांची संख्या तीन ते साडेतीन हजार असावी, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि वित्त हानीची नेमकी कल्पना आणखी काही दिवसांनीच येईल, अशी चर्चा आहे.
मंत्र्यांची दूतावासाला भेट
विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मंगळवारी दिल्लीतील सिरियाच्या दूतावासाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी या देशाचे भारतातील राजदूत बस्सम अल् खतीब यांची भेट घेऊन त्यांना भारताची सहानुभूती आणि संवेदना कळवली. भारताची सहाय्यता घेऊन दिल्लीहून निघालेले पहिले विमान अंकारा येथे पोहचले आहे. भारताने आणखी दोन विमाने सज्ज ठेवली आहेत.
तातडीची बैठक
मंगळवारी भारत सरकारने या भूकंपावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला विविध विभागांमधील अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. भूकंपग्रस्त देशांना साहाय्यता करण्यासंबंधी विचार या बैठकीत करण्यात आला. साहाय्यता कशी आणि कोणती पाठवावी यासंबंधीचा निर्णय घेतला गेला.
कर्नाटकची हेल्पलाईन
कर्नाटक राज्य सरकारने या दुर्घटनेतील पिडितांच्या सोयीसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. राज्य सरकारही भूकंपग्रस्तांना साहाय्यता पाठविणार आहे. यासाठी भारताच्या परराष्ट्र विभागाशी कर्नाटक सरकारने सातत्याने संपर्क ठेवला आहे.
जगभरातून साहाय्यतेचा ओघ
आता या भूकंपाची गंभीरता जगातील सर्व लोकांपर्यंत पोहचलेली असून जगभरातून साहाय्याचा ओघ सुरू झाला. अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी तुर्किये आणि सिरिया यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली असून या देशांच्या मागणीनुसार साहाय्यता पाठविली जात आहे.
पुन्हा भूकंपाचे धक्के
तुर्किये आणि सिरियाला पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. मंगळवारी सकाळी सोमवारच्याच वेळेला पुन्हा 6.8 रिष्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के साधारणतः मिनिटभर जाणवले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा इमारती कोसळल्या. तसेच मृतांचा आकडाही वाढला. एक मोठा भूकंप झाल्यानंतर त्याचे पडसाद अनेक दिवस उमटतात. त्यामुळे अशा भागांमध्ये त्वरित पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता असते. त्यातच सोमवारी आणि मंगळवारी या भागाला पावसाने झोडपल्याने आणि कडाक्याची थंडी असल्याने साहाय्यता कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.









