ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी (gram panchayat election) इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने खुशखबर दिलीय. आता इच्छुक उमेदवारांना अर्ज भरणे सोपे होणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता तासंतास वाट पहावी लागणार नाही. नुकतेच निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्जाचा आग्रह सोडून ऑफलाईन अर्ज भरण्याचे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागली होती. परंतु आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याचे आदेश जारी केल्याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.