प्रतिनिधी,वारणानगर
Kolhapur News : मोबाईलवर स्टेटस ठेवून वारणा नदीवरील बच्चे सावर्डे -मांगले बंधाऱ्यावरून शनिवार (दि.5) रोजी सायंकाळी वारणा नदीत उडी टाकलेल्या तुषार गणपती पांढरबळे (वय 24, रा. मांगले) याचा चौथ्या दिवशी भेंडवड़े ता. हातकणंगले येथे मृतदेह सापडला.तुषारने शनिवारी मांगले-बच्चे सावर्डे बंधाऱ्यावरून मोबाईलवर बोलत असताना उडी घेतली.उडी मारण्यापूर्वी त्याने मोबाईलच्या स्टेटसवर मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस,मी कुठेही सापडणार नाही,तुझ्याच आठवणीत जगत राहीन,पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही,असा मजकूर ठेवला होता.
वारणा नदीला आलेल्या पुरामुळे उडी मारल्यानंतर काही क्षणात तो पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला होता.नदीचे पात्र आणि प्रवाह मोठा असल्यामुळे त्याला शोधणे अवघड झाले होते.रविवारी सांगलीच्या एनडीआरएफ टीमने मांगले पुलापासून ते वाळवा तालुक्यातील चिकुर्डे पूलापर्यंत पाच किलोमीटर वारणा नदीत दोन बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली होती.परंतु सायंकाळपर्यंत तुषार न सापडल्यामुळे मोहीम थांबवली.आज चौथ्या दिवशी हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे तुषारचा मृतदेह सापडला.या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.









