वृत्तसंस्था/ कोलकाता
17 एप्र्रिल रोजी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणारी कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल लढत नव्या तारखेवर घेतली जाण्याची शक्यता आहे. त्या दिवशी रामनवमीचा उत्सव असल्याने आवश्यक सुरक्षा पुरवू शकणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे बंगाल क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला कळविले आहे.
त्याचप्रमाणे 19 एप्रिल रोजी बंगालमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र कोलकातातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. ‘रामनवमीदिवशीच सामना होणार असल्याने पोलिसांकडून या सामन्याला पुरेशी सुरक्षा पुरविली जाऊ शकणार नाही,’ असे कोलकाता पोलिसांनी सीएबी अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांना पत्र लिहून कळविले आहे. सीएबीने हा सामना एक आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी किंवा एक दिवस पुढे 18 एप्रिल रोजी खेळविला जावा, असे सुचविले आहे. केकेआरचा हा घरच्या मैदानावरचा सामना असल्याने तो ईडन गार्डन्सवरच खेळविल जाईल, असे सीएबीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
केकेआर संघ सध्या विशाखापटनम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी आहे. सामन्याच्या तारखेत बदल करण्याबाबत बीसीसीआयसमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘तारखेत बदल झाल्यास अडचणींची साखळीच तयार होईल. प्रवासाचे वेळापत्रक, प्रक्षेपणकर्त्यांच्या योजनेत बदल, तिकीटविक्रीची समस्या अशी ही साखळी असेल. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.
सीएबीने सुचविलेल्या तारखांपैकी 18 एप्रिलला सामना आयोजित करणे अडचणीचे ठरू शकते. कारण दुसऱ्याच दिवशी कूच बिहार, अलिपुरदुआर, जलपायगुडी येथे मतदान असल्याने पोलीस उपलब्ध होण्याबाबत अडचण होऊ शकते. मात्र कोलकात्यात 1 जूनपर्यंत मतदान होणार नसल्याने कदाचित 18 रोजीच सामना आयोजित केला जाऊ शकतो.









