कोल्हापूर / सुधाकर काशीद :
यंदाचे 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर झाले आहे. सहकाराचे महत्व त्यामुळे जगात अधोरेखित झाले आहे. पण बरोबर 75 वर्षे झाली. राज्यात नव्हे तर देशातील पहिले सहकारी तत्त्वावरील धरण कोल्हापूर जिह्यात उभे राहिले आणि पाण्याचा साठा आपल्या कवेत घेऊन ते आजही उभे आहे. सहकार तत्वावर उद्योग, बँका, कारखाने उभारता येतील. पण सहकार तत्वावर पाण्याचे नियोजन तेही 75 वर्षांपूर्वी सांगरुळसारख्या छोट्या गावात. ही कल्पनाच सहकाराच्या तत्त्वाचे मूळ आजही किती भक्कम आहे, याचा पुरावा ठरले आहे. जगभरात हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जरूर साजरे होईल. पण देशातल्या 75 वर्षांपूर्वीच्या सहकार तत्वावरील पहिल्या धरणाला आपण आवर्जून भेट दिली तर सहकाराची ताकद प्रत्यक्षात समोर पाहता येईल आणि कृतज्ञताही व्यक्त करता येईल.
कोल्हापूर जिह्यातील करवीर तालुक्यात कुंभी नदीवर सांगरूळ येथे हे सहकार तत्वावरील धरण आहे. कोल्हापूरपासून अवघ्या 10 किलोमीटरवर ते आहे. धरण आजही सुस्थितीत आहे. साधारण 3 हजार हेक्टरातील शेतीला हे धरण पाणी देत आहे. केवळ शेतीच फुलवते, असे नव्हे तर परिसरातील दहा–बारा गावे, वाड्या–वस्तीवरच्या इथल्या माणसांचे जीवनच फुलवत आहे. सांगरूळ हा परिसर त्यामुळेच पीक पाण्याच्या दृष्टीने सधन परिसर म्हणून आपली ओळख टिकवून आहे.
सांगरूळ कुडित्रे परिसरातून कुंभी नदी वाहते. परिसरातील लोकांचा मूळ व्यवसाय शेती. शेजारून नदी वाहते. पण त्या काळात पाण्याचे नियोजन करण्याची फारशी सोय नसल्याने पावसावरच बऱ्यापैकी सारे अवलंबून होते. पण तशा परिस्थितीत सांगरुळच्या बळीराम नाना खाडे, स. ब. खाडे, डी. आर. नाळे मास्तर, डी. ए. सावंत यांनी कुंभी नदीचे पाणी अडवून ते शेतीसाठी देता येईल का, असा विचार केला. विचार करा. 75 वर्षांपूर्वीचा काळ. कोणतेही तंत्रज्ञान जवळ नाही. हाताशी पैसा नाही. कसलेही भक्कम पाठबळ नाही, अशा परिस्थितीत केवळ आपण सर्वजण मिळून करू शकू. एकीची ताकद दाखवून देऊ शकू, हा विचार प्राधान्याने या निमित्ताने पुढे आला. पाणी अडवायला छोटे धरण किंवा दगडी बांध उभा करायचा तर परवानगीचाही प्रश्न आला.
परवानगीशिवाय तर काही होणार नव्हतेच. त्यामुळेच त्यावेळच्या मुंबई राज्याचे चीफ इंजिनियर चाफेकर यांना ही कल्पना समजावून सांगण्यात आली. तो अधिकारीही इतका दूरदृष्टीचा की, तुम्हाला हे जमेल का? नको ते उरावर कशाला घेता? असे सल्ले न देता त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर धरणासाठी भांडवल उभारण्यास सुरुवात झाली. त्यासाठी आसपासच्या गावांतील मिळून 24 जणांची समिती स्थापन करण्यात आली. शेअर्स भांडवल म्हणजे काय, हे कोणाला माहिती नव्हते, पटवून देणेही थोडे अवघड होते. पण 24 संस्थापक इतके चिवट की, आपले डोके थंड ठेवत त्यांनी प्रत्येकाला धरणाच्या पाण्याचे महत्व पटवून दिले. आणि त्याहून विशेष असे, की खर्च टाळण्यासाठी धरणाचे बांधकाम श्रमदानाने करण्याचे ठरवले.
या धरणाचा आराखडा तयार केला आणि आठ–दहा गावांतील लोक धरणाच्या कामासाठी म्हणजेच श्रमदानासाठी रोज येऊ लागले. वाळूची पोती टाकून पाणी अडवण्यात आले. दगड, माती, चुना यातून धरणाचे बांधकाम सुरू झाले. धरणाला गेट नाही. पण दोन भिंतींच्या मध्ये लाकडाचे चौकोनी मोठे कापीव ओंडके टाकून पाणी अडवायचे ठरले. धरण बांधणीचा पाया मुंबई राज्याचे तत्कालीन चीफ इंजिनियर चाफेकर यांनी घातला. एका चांदीच्या थापीने त्यांनी पहिल्या दोन दगडात चुना भरला. हळूहळू धरणाचे काम पूर्ण झाले. सहकारी तत्त्वावर पाणी वाटप सुरू झाले. पाण्याचा उपसा रस्टन क्रूड ऑईल इंजिनच्या सहाय्याने होऊ लागला. कुंभी नदीचे पाणी 10-12 गावांतील शिवारात खेळू लागले. प्यायला मिळू लागले.
या धरणाला 19 पिलर आहेत. लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने पाणी अडवले आहे. 1971 मध्ये कोगे खडकावर आणखी धरण बांधून पाण्याचा विस्तार वाढवण्यात आला. या पाण्यावर सांगरूळ, सावर्डे, मरळी, मोरेवाडी, चिंचवडे, कळंबे, आडूर, कोपर्डे, कुडित्रे, म्हारूळ, बहिरेश्वर परिसरातील वाड्या–वस्तीची शेती फुलते. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना चालतो. एक आदर्श असे सहकारातून उभारलेले हे देशातले पहिले धरण आहे. कालपासून जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सुरू झाले आहे. पण आपण 75 वर्षांपूर्वी सहकाराच्या माध्यमातून एक छोटे धरणच उभे करू शकलो, हे काय साधे, सोपे काम आहे ?
मोरारजी देसाईंची भेट
या धरणाचा लौकीक असा की, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या धरणाला भेट देऊन त्याचे कौतुक केले. हेच धरण पुढे कोल्हापूर टाईप बंधारा म्हणून देशभर गाजले व त्याचे अनुकरण सर्वत्र केले गेले.
एकविचाराने धरणे जपले अन् पुढेही जपणार
सहकारी तत्त्वावरील या धरणाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भोसले आहेत. ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष उत्तम कासोटे आहेत. धरणाची माहिती देताना त्यांनी हे धरण म्हणजे सहकार या शब्दाचे वास्तवात आलेले अमूल्य असे स्वरूप असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या परिसरातील आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने एक विचाराने हे धरण जपले आहे आणि पुढेही जपले जाणार आहे.
पायाचे दगड
सांगरुळ धरणाच्या पायाचे दगड हे 24 जण आहेत. बळीराम खाडे, दादू संतू खाडे, बाळा रावजी नाळे, गणपती बळवंत मोरबाळे, ज्योती नाना गुरव, पांडुरंग म्हेतर, दत्तोबा रामा नाळे, रामचंद्र विठ्ठल नाळे, कल्लाप्पा जंगम, शंकर सखाराम नाळे, नारायण बाबाजी खाडे, शंकर बळवंत मेटे, रावजी बळवंत खाडे, साधू राघू चौगुले, पांडुरंग म्हेतर, शिवा धोंडी पाटील, गणपती यादव, बाबाजी देवकर, दत्तात्रय पाटील, नारायण मोरबाळे, श्रीपती देसाई, सदाशिव खाडे, दिनकर नारायण पाटील, बळवंत लक्ष्मण पाटील, जोती रामजी पाटील, भाऊ नाना भोसले.








