वास्को बेलाबाय भागातील प्रकार, तीन दिवसांनी मिळाली संबंधित विभागाला खबर, दुरूस्ती काम सुरू
वास्को : वास्कोतील बेलाबाय भागात सांडपाण्याच्या वाहिनीवर माड कोसळल्याने ती फुटून शेत जमीनीत वाहत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सांडपाणी व्यवस्थापन विभागाने दुरूस्तीच्या कामास सुरवात केली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी पुढील दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. शेतजमीनीत हा प्रकार घडल्याने या घटनेची कल्पना उशिरा आली. त्यामुळे शेतजमीनीत सांडपाणी वाहून चिखल निर्माण झालेला आहे.
बेलाबाय भागातील खाप्रेश्वर देवस्थान जवळच्या एका चाळीसमोरील शेतजमीनीत एक माड तेथील सांडपाण्याच्या वाहिनीवर कोसळला. तीन दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसात ही घटना घडली. बेलाबाय येथील या शेतजमीनीवरून ही वाहिनी गेलेली असून त्या जमीनीत रान माजलेले आहे. पावसाळ्यात पाणी साचत असल्याने या जमीनीत चिखल आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी सांडपाण्याच्या वाहिनीवरच माड कोसळल्याने ती फुटून वाहू लागली. सकाळच्या वेळी ती धो धो वाहत असूनही जवळपासच्या लोकांना या घटनेची कल्पना आली नाही. या घटनेच्या जवळच काही भाडेकरू राहतात. त्यांना हा प्रकार समजला तरी काय करावे हे त्यांना कळेना. सकाळच्या वेळी येथील काही घरांना दुर्गंधीही सहन करावी लागते. त्यामुळे या प्रकाराकडे इतरांचे लक्ष गेले व संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. स्थानिक नगरसेवक गिरीश बोरकर यांनी या घटनेची दखल घेऊन उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सांडपाणी विभागाने या वाहिनीच्या दुरूस्ती कामाला सुरवात केली आहे. सांडपाण्याचे जेव्हा पंपींग करण्यात येते तेव्हाच या वाहिनीचा वापर होत असतो. ही वाहिनी आता पुन्हा जोडावी लागणार असल्याने पंपींगच्या कामावर परीणाम होणार आहे. सदरच्या शेतजमीनीत सांडपाणी भरलेले असल्याने व चिखलही निर्माण झालेला असल्याने ही वाहिनी जोडण्याचे काम जिकीरीचे ठरलेले असून संबंधीत खात्याने कामाला सुरवात केली आहे.









