बेंगळूर :
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथ बुधवारपासून दक्षिण विभाग व उत्तर विभाग यांच्यातील दुलिप करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्याला प्रारंभ होत आहे. या सामन्यासाठी दक्षिण विभागाला वॉशिंग्टन सुंदरच्या तंदुरुस्ती समस्येबाबत चिंता वाटत आहे.
वॉशिंग्टन सुंदरला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे यापूर्वी जवळपास सहा महिने क्रिकेट क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले आहे. आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर समोर आपल्या फॉर्मची तसेच तंदुरुस्तीची समस्या राहणार आहे. 2023 च्या क्रिकेट हंगामातील दुलिप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर विभागाने नॉर्थ
-ईस्ट विभागाचा 511 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघामध्ये भविष्यकाळात स्थान मिळवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला हा सामना महत्त्वाचा राहिल. तामिळनाडूचा 23 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन हा सध्या भारतीय नवोदित क्रिकेटपटूमध्ये एक दर्जेदार अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. दरम्यान गेल्या 6 वर्षांच्या कालावधीत वॉशिंग्टन सुंदरला तंदुरुस्तीच्या समस्या वारंवार जाणवत असल्याने त्याला अनेक स्पर्धांना मुकावे लागले आहे. वॉशिंग्टनने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 4 कसोटी, 16 वनडे आणि 35 टी-20 सामने खेळले आहेत.
2023 च्या आयपीएल स्पर्धेतील पूर्वार्धातच वॉशिंग्टनला स्नायू दुखापत झाल्याने त्याला ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. या सामन्यासाठी बेंगळूरमध्ये राष्ट्रीय निवड समितीचे 3 सदस्य दाखल झाले आहेत. आयपीएल स्पर्धेत फलंदाजीत चमकदार कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज साईसुदर्शन या सामन्यात दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ध्रुव शोरे, जयंत यादव, प्रभसिमरन सिंग आणि हर्षित राणा हे उत्तर विभाग संघातील प्रमुख खेळाडू आहेत.









