बोर्डे डिचोलीतील होमकुंड उत्सवात भाविकांची गर्दी : युवकांसह बाल धोंडगणांचाही सहभाग
प्रतिनिधी / डिचोली
बोर्डे डिचोली येथील देव श्री वडेश्वराच्या प्रांगणात शिमगोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे या उत्सवातील व्रतस्थ धोंडगण व देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार केले. हे दृश्य पाहण्यासाठी बोर्डे गावातील वडेश्वराच्या प्रांगणात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
डिचोली तालुक्मयात अनेक ठिकाणी होमकुंड उत्सव साजरा केला जातो. बोर्डे येथील होमकुंड उत्सवाची ही परंपरा टिकवून ठेवताना यावर्षी मोठ्या संख्येने युवा धोंडगण या उत्सवात सहभागी झाले होते. या धोंडगणांच्या सोवळ्या व्रताला होळीच्या दिवसापासून प्रारंभ झाला होता. तर बुध. दि. 8 रोजी होमकुंड उत्सवाच्या दिवशी या धोंडगणांनी केवळ फराळ ग्रहण केला.
श्री देव वडेश्वराच्या प्रांगणात होमकुंड रचून ठेवण्यात आले होते. रात्री देवीचा कळस व धोंडगणांनी होमकुंडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर होमकुंडाला अग्नि दिला व देवीचा कळस व धोंडगण गावतडी (व्हाळशी) येथील पवित्र झरीवर स्नानासाठी गेले. या झरीवर स्नान केल्यानंतर तसेच देवीच्या कळसाला नेसविण्यात आले. कळस व धोंडगण पूर्ववत श्री वडेश्वर देवस्थानजवळ निघाले. येताना वाटेत भेटणाऱ्या श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्रीवंत देवळी, चव्हाटा येथील ब्राह्मण या देवतांना दर्शन देत तसेच ओटी भरत वडेश्वर देवस्थानजवळ दाखल झाले. यावेळी सर्वप्रथम धोंडगणांनी मुखातून देवाचे नाव जपत होमकुंडातून मार्गक्रमण केले. तर नंतर कळस घेतलेला मोडपुरूषाने होमकुंडातून मार्गक्रमण केले. त्यानंतर देवीचा सर्वांना कौलप्रसाद दिल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.









