सातेरीदेवी-रवळनाथ मंदिरांच्या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात : आज मूर्तीप्रतिष्ठापना
वार्ताहर /किणये
बेळवट्टी गावातील सातेरी देवी व रवळनाथ मंदिरांच्या लोकार्पण सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी सातेरी माऊली व रवळनाथ मंदिरांच्या कळस मिरवणुकीला सुरुवात झाली. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून ही मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्ये आणि टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक संपूर्ण गावभर फिरली. या मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीचे प्रत्येक घरासमोर जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. मिरवणुकीत तरुणांनी भंडाऱ्याची उधळण केली. ‘सातेरी माऊली की जय, रवळनाथ भगवान की जय’ असा जयघोष करण्यात आला. यामुळे अवघा गाव दुमदुमून गेला होता. या कलश मिरवणुकीमुळे मंगळवारी गावाला जणू यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. या दोन्ही मंदिरांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावात चार दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी यांचा जागर भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवार दि. 24 रोजी सातेरी देवी व रवळनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर वास्तुशांती, होमहवन होणार आहे. मदन पुराणिक गुरुजी संकेश्वर यांच्या पौरोहित्याखाली सर्व विधी पार पाडण्यात येणार आहेत. सायंकाळी धर्माचार्य परमपूज्य भगवानगिरी महाराज यांच्या उपस्थितीत मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजता कुद्रेमनी येथील विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचा जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गावातील भजनी मंडळाचा रात्र जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.









