सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा फर्मागुडीत शुभारंभ
प्रतिनिधी/ फोंडा
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांसह देशविदेशातील हजारो साधक व धर्मप्रेमींच्या उपस्थितीत फर्मागुडीच्या विस्तीर्ण पठारावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला शनिवारपासून सुऊवात उत्साहात झाली आहे. सनातन संस्थेतर्फे गोव्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या अशा महोत्सवात शेकडो संत, महंतांबरोबरच राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून सनातन हिंदू राष्ट्राच्या उत्थानाची ही सुऊवात असल्याचे सांगून त्याची सुऊवात गोमंतभूमीत झाल्याने जगभर या कार्यसिद्धतेचा संदेश पोचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या 83 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून हा तीन दिवशीय महोत्सव फर्मागुडीच्या गोवा अभियांत्रिकी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. डॉ. जयंत आठवले व सौ. कुंदा जयंत आठवले यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवरांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, तपोभूमीचे पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामी, देवकीनंदन ठाकूर, सनातन संस्थेचे वीरेंद्र मराठे, म्हैसूर वडियार राजघराण्याचे यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार, सुदर्शन चॅनेलचे डॉ. सुरेश चव्हाणके व सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक आदी उपस्थित होते.
गोव्याची आध्यात्मिक ओळख जगभर पोहचणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्याच्या भूमीत शंखनाद महोत्सव होणे हे परमभाग्य असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सनातन संस्थेने आरंभलेले आध्यात्मिक, सांस्कृतिक व धर्माचरणाचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. गोवा ही भोगभूमी नसून योगभूमी आहे. योगा, संस्कृत, वेदाध्ययनासारखे कार्य तपोभूमीच्या माध्यमातून सुरु आहे. सांगे येथील संस्कृत पाठशाळेमध्ये व्याकरण, गणित, अर्थशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. गोव्यात कदंब कालीन वैभवशाली राजवट होती. शिवछत्रपतींनी येथील पोर्तुगीजांच्या धर्मांतराला आळा घालून येथील हिंदू धर्म व संस्कृतीला अभय दिले. हा वैभवशाली वारसा प्राचीन सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण करून जपलेला आहे. गोव्यातील मंदिरांमध्ये सरकार कुठलाच हस्तक्षेप करीत नसून सर्व मंदिरांवर स्थानिक लोकांचे व्यवस्थापन आहे. गोव्याएवढी स्वच्छ व सुंदर मंदिरे इतर कोठेही पाहायला मिळणार नाहीत. शंखनाद महोत्सवातून गोव्याची आध्यात्मिक ओळख जगभर पोचणार आहे. त्यातून धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. ज्यातून पर्यटन व अर्थकारणाला चालना मिळेल. रुढार्थाने आपला देश हिंदूस्थान असला तरी येथे सर्व धर्मियांसाठी धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
सनातन राष्ट्रनिर्मितीला महोत्सवातून ऊर्जा मिळेल : श्रीपाद नाईक
शंखनाद राष्ट्र महोत्सव देवभूमी गोमंतकात होणे याला विशेष महत्त्व आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. गोमंतकीयांच्या पूर्वजानी पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटीत आपले बलिदान देऊन येथील हिंदू धर्म व संस्कृती जोपासली. शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेल्या या परशुराम भूमीत होणारा हा महोत्सव म्हणजेच हिंदू राष्ट्रासाठी शुभ संकेत आहेत. सनातन राष्ट्र ही संकल्पना मुळातच विश्व कल्याणाची आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून माणसांबरोबरच समस्त सृष्टीतील चराचराच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या प्रतिज्ञेला या महोत्सवामुळे ऊर्जा मिळणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सनातन हिंदू राष्ट्र संकल्पनेमध्ये भाजपाचेही योगदान असल्याचे सांगून हिंदूंना प्राचीन काळापासून संघर्ष करावा लागला. अयोध्येतील राममंदिराची संकल्पना ही याच राष्ट्रनिर्मितीचा भाग आहे. भारताचे प्राचीन वैभव व संस्कृती टिकविण्यासाठी आजचा काळ हा योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
आध्यात्मिक कार्याच्या प्रसाराची मुहुर्तमेढ उभारली : मंत्री सुदिन ढवळीकर
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सनातन धर्म व संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचे पुनरुत्थान सनातन संस्था करीत असून महोत्सव हे त्याचेच प्रयोजन आहे. राष्ट्र पुढे जायचे असल्यास धर्म कार्य तेवढेच महत्त्वाचे आहे. हिंदू राष्ट्रासाठी सुरु असलेल्या या कार्याची फलश्रुती निश्चितच होणार आहे. विशेष म्हणजे हे कार्य आपल्या मतदारसंघातून होत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. सनातन संस्था व तपोभूमी कुंडई या दोन्ही संस्थांनी आध्यात्मिक व धार्मिक कार्यातून या प्रचार प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली आहे.
सनातन धर्मामुळेच जगात शांतता नांदेल : प.प. ब्रह्मेशानंद स्वामीजी
तपोभूमीचे पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामीजीनी सनातन धर्मामुळेच जगात खऱ्या अर्थाने शांतता नांदेल, असे सांगून समस्त हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कुठल्याही धर्माचा द्वेष करणे हिंदू धर्माची शिकवण नाही. मात्र स्वसंस्कृती व धर्माच्या संरक्षणासाठी सामर्थ्यवान होणे तेवढेच गरजेचे आहे. सनातन संस्था ही धर्म शिक्षा व धर्मप्रसारासाठी समर्पितपणे कार्य करणारी महत्त्वाची संस्था असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याला त्यांनी आशीर्वाद दिले.
कर्नाटक राज्यातील खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार म्हणाले, भारताची वैभवशाली संस्कृती व पारंपरिक मूल्यांची पुनउ&भारणी करण्यासाठी सनातन हिंदू संस्कृतीचे कार्य आवश्यक आहे. त्यासाठी प्राचीन शास्त्रांची नव्याने उभारणी करावी लागेल. राष्ट्र म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखताना सामाजिक सलोखाही जपणे गरजेचे आहे.
पत्रकार सुरेश चव्हाणके म्हणाले, शंखनाद महोत्सवातून गोव्यात हिंदू राष्ट्राच्या दिशेने नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे.
देवकीनंदन ठाकूर यांनी येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी हिंदू राष्ट्र होणे काळाची गरज असल्याचे सांगून गोवा आध्यात्मिक राज्य म्हणून या महोत्सवातून पुढे येईल. येथील मंदिरे, गोशाळा, वैदिक शिक्षणाच्या प्रसाराला अशा उपक्रमातून प्रेरणा मिळेल, असे नमूद केले.
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे हिंदी भाषेतील चरित्र ग्रंथाचे तसेच ईबुकचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्यावतीने एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतीर्लिंगाचे दर्शन सर्वांना व्यासपीठावऊन देण्यात आले. महोत्सवाच्या परिसरात भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णचे तसेच अफझलखान वधाचे भव्य कटआऊट उभारण्यात आले आहेत.
शस्त्रप्रदर्शन पाहून अंगावर रोमांच उठले : मंत्री रोहन खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी महोत्सवाला भेट देऊन येथील शस्त्र प्रदर्शनाची पाहणी केली. ते म्हणाले की, शिवकालीन शस्त्रात्रे अंगावर रोमांच उठवणारी असून त्यातून ऐतिहासिक लढाया व योद्धे केवढे पराक्रमी असतील याचा अंदाज येऊ शकतो. नवीन पिढीला इतिहास जाणून घेण्यासाठी हे शस्त्र प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. आपले संस्कार व संस्कृती पुढे घेण्यासाठी ही विचारधारा पुढे नेण्याची गरज आहे.
महोत्सवातील आजचे कार्यक्रम
शंखनाद महोत्सवात आज रविवार दि. 18 रोजी सकाळी श्रीराम राज्य संकल्प जपयज्ञ, ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या सत्रात माजी सूचना आयुक्त उदय माहूरकर, नॅशनल सेंटर फॉर हिस्टोरिकल रिसर्च अॅण्ड एनालिसिसचे अध्यक्ष नीरज अत्री, न्यायमंत्री कपिल मिश्रा, तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह यांचा सहभाग असेल. दुपारी 3.30 ते 6 वा. यावेळेत डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. अॅड. हरिशंकर जैन, पद्मश्री आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड व पंचशिल्पकार काशिनाथ कवटेकर यांची मनोगते व त्यानंतर सनातन राष्ट्राच्या धर्मध्वजाचे अनावरण होईल.









