नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ‘नेमेची येते संकट’ अशीच सध्या महाराष्ट्रासह समस्त देशवासियांची भावना झाली आहे. यंदाचा पावसाळा तर अनेकार्थांनी वैशिष्ट्यापूर्ण ठरला आहे. यंदा उन्हाळ्यातच म्हणजे मे महिन्यापासूनच पावसाला सुऊवात झाली. महिनाभर आधी सुरू झालेला पाऊस अजूनही कमी व्हायचे नाव घेत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. मे, जूनमध्ये बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहिले असले, तरी अर्धा ऑगस्ट महिना पावसाने धुऊन काढला. त्यानंतर पावसाळ्याचा शेवटचा महिना असलेल्या सप्टेंबरमध्ये वऊणराजाने ठिकठिकाणी ऊद्रावतार धारण केल्याचे बघायला मिळते. मागच्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह मराठवाडा, कोकणाच्या अनेक भागांत या काळात अतिवृष्टीची नोंद झाल्याचे दिसून येते. पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर, उरळी कांचन भागांत झालेला पाऊस अभूतपूर्वच ठरावा. या ढगफुटीसदृश पावसाने घरे, सोसायट्या, दुकाने पाण्याखाली गेलीच. शिवाय वाहनेही वाहून गेल्याचे दृश्य अनेक भागांत पहायला मिळाले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफच्या टीमला पाचारण करावे लागले. तसेच आपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली. अहिल्यानगरमधील पाथर्डी, शेवगाव भागावर अशाच प्रकारे आभाळ कोसळले. या पावसाचा ओघ इतका प्रचंड होता, की काही ठिकाणी पूल वाहून गेले. तर गावामध्येही पाणी शिरल्याने तेथील जनजीवनही विस्कळित झाले. याशिवाय जालना, बीड, लातूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोकणचा उर्वरित भाग यांसह पश्चिम महाराष्ट्रालाही पावसाने जोरदार तडाखा दिल्याचे दिसून येते. राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक भागांत पूरस्थिती दिसते. परिणामी सोयाबीन, कापूस, ऊस, कडधान्यासह लाखो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे पहायला मिळते. स्वाभाविकच अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देणे, हे सरकारचे कर्तव्य असेल. तसे पाहिल्यास या वर्षी पाऊस चांगला झाला. परंतु, बदलता ट्रेंड व त्याचा ढगफुटी अवतार यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस होत्याचे नव्हते करणाराच ठरला. परत आणि परत हेच संकट उद्भवल्याने बळीराजा हवालदिल झाल्याचेच दिसते. मान्सूनचे आगमन, त्याची पुढची वाटचाल आणि त्यानंतर परतीचा प्रवास हे तिन्हे टप्पे महत्त्वाचे असतात. आता मोसमी पाऊस या तिसऱ्या टप्प्यात आहे. राजस्थानमधून रिटर्न मान्सूनला सुऊवात झाली असून, तो गुजरातपर्यंत म्हणजेच महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत माघारी परतला आहे. हे बघता सध्या पडणारा पाऊस हे परतीच्या पावसाचेच ऊप म्हणायला हवे. परतीच्या पावसाचा कालावधी हा निश्चित नसतो. कधी त्याचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांचा असतो, तर कधी हा पाऊस महिनाभरापर्यंत चालल्याचीही उदाहरणे आहेत. परतीच्या पावसाचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे हा पाऊस अचानक येतो. अचानक आलेला हा पाऊस अनेकदा धो धो बरसतो. अर्धा तास, तासभर पडणाऱ्या या पावसाने शहरातील, ग्रामीण भागातील सर्व व्यवस्था कोलमडून पडतात. अनेकदा कमी कालावधीत जास्त पावसाची नोंद होते. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. काही वेळा हा पाऊस विजांच्या कडकडाटासह येतो. अशा वेळी शेतामध्ये वीज पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हा पाऊस सर्वच भागात एकसमान असेलच, असे नसते. सध्या हाच अनुभव देशातील नागरिक घेत आहेत. तसा हा पाऊस रेंगाळल्याचाही इतिहास आहे. अगदी दिवाळीत किंवा त्यानंतरपर्यंत परतीचा पाऊस सुरू राहिल्याचे आपण पाहिले आहे. हे बघता यंदाच्या परतीच्या पावसाचा पुढचा प्रवास कसा राहणार, याबाबत औत्सुक्य असेल. पावसाचा घणाघात पुढचे दोन ते दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हे लक्षात घेत सर्व शक्याशक्यता गृहीत धरून आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मागच्या केवळ तीन दिवसांच्या पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक नागरिक बेघर झाले आहेत. कित्येकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. ही दाणादाण कायम राहिली, तर पुढच्या टप्प्यात हाहाकार उडू शकतो. त्यामुळे सरकारने आत्तापासून योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पूरस्थितीची शक्यता ध्यानात घेऊन नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करायला हवे. खरे तर यंदाचा पाऊस हा खऱ्या अर्थाने ढगफुटीचा ठरला आहे. मागच्या चार महिन्यांत पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत ढगफुटीचे प्रकार घडले आहेत. पूर्वीही असा अतिरिक्त पाऊस पडायचा. परंतु, यंदा त्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, असे नक्कीच म्हणता येईल. साधारणपणे 100 मिमीपेक्षा अधिकचा पाऊस तास, अर्ध्या तासात झाला, तर आपण त्याला ढगफुटी म्हणतो. ही ढगफुटी चार ते पाच किमीच्या भागात होणे, हे नवे संकटच म्हणता येईल. या साऱ्याच्या मुळाशी प्रामुख्याने बदलते हवामान वा ग्लोबल वॉर्मिंग हाच घटक आहे, हे आता वेगळे सांगायला नको. मानवी आक्रमण, निसर्गाचा ऱ्हास, डोंगरफोड यांसारख्या गोष्टी अशाच होत राहिल्या, तर दिवसेंदिवस या संकटात वाढच होत जाणार आहे. मान्सून वा मोसमी पाऊस हा लहरीच आहे. परंतु, जंगलतोड व पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तो अधिकच लहरी होत आहे. त्याचा लहरीपणा असाच वाढत राहिला, तर मानवी आयुष्याबरोबरच शेतीपुढची संकटे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. म्हणून आता तरी शहाणे व्हायला हवे. अतिनागरीकरणाला आळा घातला पाहिजे. त्याचबरोबर जंगलतोडीला पूर्णपणे पायबंद घालून हरित पट्ट्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत. दुष्काळ ओला असो वा कोरडा तो शेवटी दुष्काळच असतो. त्यातून जीवसृष्टी नाडलीच जाते. त्यामुळे या परतीच्या संकटापासून मुक्तता मिळविण्यासाठी माणसालाही बदलावे लागेल.








