पोलीस महासंचालकांची माहिती, पणजीत मानवी व्यापार विरोधी दिन
प्रतिनिधी /पणजी
विविध गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या संशयिताना पोलीस अटक करतात मात्र प्रकरण न्यायालयात पोहोचले की संशयित मोकाट सुटतात, याला अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे तपास अधिकाऱयांचे कमी पडत असलेले काम. आता तपास अधिकाऱयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे एखाद्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली तर त्याला न्यायालयात शिक्षा होणारच यात शंका नाही, असे पोलीस महासंचालक जस्पाल सिंग यांनी सांगितले.
गोवा पोलीस खाते व अर्ज या बिगर सरकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी जागतिक मानवी व्यापार विरोधी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस महासंचालक जस्पाल सिंग बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अर्जचे संचालक अरुण पांडे, पोलीस अधीक्षक बॉसेट सिल्वा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोवा पोलीस खात्याच्या अधिकाऱयांची काही दिवसापूर्वीच सरकारी वकींलांसोबत बैठक घेतली. अधिकाधिक गुन्हेगारी प्रकरणातून संशयितांची निर्दोष कसे सुटतात यावर सखोल चर्चा करण्यात आली. संशयित निर्दोष सुटण्याची अनेक कारणे वकीलांसोबत घेतलेल्या बैठकीतून पुढे आली असून त्याच्यावर पोलीस तोडगा काढणार असल्याचेही पोलीस महासंचालक जस्पाल सिंग यांनी सांगितले.
गोवा पोलीस खात्याने आत्ता पर्यंत मानवी व्यापार प्रकरणात किती गुन्हे नोंद केले आणि किती संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे याबाबत पोलीस अधीक्षक बॉसेट सिल्वा यांनी सविस्तर माहिती दिली.
मानव व्यापारी प्रकरणात पोलीस कारवाई करतात आणि संशयितांना अटकही करतात मात्र न्यायालयात त्यांना शिक्षा होत नाही यासाठी पोलिसांनी व्यावस्थित चौकशी करणे महत्वाचे आहे, असे अर्जचे संचालक अरुण पांडे यांनी सांगितले.
सुरुवातील आझाद मैदान ते कला अकादमीकडे वळसा घालून पुन्हा आझाद मैदानापर्य रॅली काढण्यात आली. नंतर आझाद मैदावर विविध कार्यक्रम झाले. धेंपे महाविद्यालय, कारमेल कॉलेज, पार्वतीबाई चौगुले कॉलेज यांनी पथनाटय़, कविता सादरीकरण सारखे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमात विविध खाजगी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अर्जचे संचालक अरुण पांडे यांनी स्वागत करून मान्यवरांची ओळख करून दिली. पोलीस निरीक्ष रिमा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. अर्जचे निमंत्रक जुलीयाना लोहार यांनी आभार मानले.
पोलिसांना सहकार्य हवे : सिल्वा
कोणत्याही प्रकरणात संशयितांवर कारवाई करण्यासाठी त्या संशयितासंदर्भात माहिती मिळणे महत्वाचे असते. माहिती मिळाल्यावर पोलीस सहज काम करू शकतात. त्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी असून माहिती देण्यासाठी लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक बॉसेट सिल्वा यांनी केले.









