एफआयआरमध्ये अनेक नेत्यांचीही नावे
ढाका
बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात गुन्हे नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विरोधात आता एका दुकानदाराच्या हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 19 जुलै रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथील मोहम्मदपूर भागात पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात दुकानदार अबु सईद यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता माजी पंतप्रधानांच आरोपी करण्यात आले आहे. शेख हसीना यांच्यासोबत याप्रकरणी आणखी 6 आरोपी आहेत.
शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगचे महासचिव ओबैदुल कादर, माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल, माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून, गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख हारुनोर रशीद, माजी पोलीस आयुक्त हबीबुर रहमान यांच्यासोबत विप्लव कुमार सरकार यांना याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.
अनेक पोलीस अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनाही या हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. हत्येसंबंधी तक्रार मोहम्मदपूरचे रहिवासी आमिर हमजा शातिल यांनी ढाका न्यायदंडाधिकारी राजेश चौधरी यांच्यासमोर नोंदविली आहे. हत्येशी निगडित हे प्रकरण आरक्षणविरोधी आंदोलनाशी जोडलेले आहे. 19 जुलै रोजी ढाका येथील बोसिला भागात आरक्षण विरोधात आंदोलन केले जात असताना पोलिसांनी गोळीबार केला. यात अबु सईद यांना जीव गमवावा लागला होता.









