सांगली :
महाराष्ट्राचा गुन्हेसिद्धीचा दर अगदी नगण्य म्हणजे नऊ टक्के इतका खाली आला होता. तो पुन्हा वाढत चालला असून तो सध्या 50 टक्केपर्यंत वाढला आहे. आता तो 70 टक्केपर्यंत वाढला पाहिजे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाचे, कडेगाव पोलीस स्टेशन आणि आटपाडी पोलीस स्टेशनचे उद्घाटन, याशिवाय सांगलीत होणाऱ्या 224 निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, धनंजय महाडिक, आमदार जयंत पाटील, विश्वजीत कदम, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजीत देशमुख, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, पोलीस महासंचालक राज्य पोलीस गृहनिर्माण श्रीमती अर्चना त्यागी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. पण याच महाराष्ट्रात गुन्हे सिद्धीचा दर अगदी नऊ टक्क्यांवर आला होता. त्यानंतर पोलिसांना तत्काळ गुन्हे सिद्धीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिल्यामुळे हा दर आता 50 टक्केपर्यंत वाढला आहे. यापुढील काळात हा दर 70 टक्के करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या पद्धतीने कामकाज करावे, असेही त्यांनी सांगितले.
- 48 तासात चार्जशिट आणि सात दिवसात शिक्षा
महाराष्ट्रात एका महिलेवर अन्याय झाला होता. हा अन्याय तत्काळ दूर करण्यासाठी पोलिसांनी 48 तासात चार्जशिट दाखल केले आणि सात दिवसात या खटल्याचा निकाल लागून आरोपींना शिक्षा लागली आहे. यापुढील काळात शिक्षा लागण्यासाठी वेळ लागणार नाही. यापुढे आरोपींना तारीखवर तारीख हा खेळ चालू देणार नाही. त्यांना दोन तारखात हा खटला चालू ठेवावा लागेल. त्यातून निकालाची गती वाढू शकते. त्यामुळे पोलिसांनी आपला तपास आता चांगल्या पध्दतीने करावा. टेक्निकल आणि मेडिकल पुरावा हा शिक्षा लागण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आता चार्जशिट 60 दिवसात दाखल करण्याचा आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळेही खटले तत्काळ सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
- अंमली पदार्थामध्ये अडकल्यास तत्काळ बडतर्फ
अंमलीपदार्थ हा मोठा गुन्हा आहे. यातून आपली भावी पिढी आपण अडचणीत आणत आहे. त्यामुळे यापुढील काळात अंमलीपदार्थावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. एखादा पोलीस या प्रकरणात अडकला तर आता त्याला तत्काळ बडतर्फ केले जाणार आहे, असेही सांगितले. याशिवाय पोलिसांनी आपल्या कामगिरीकडे लक्ष द्यावे, असही त्यांनी स्पष्ट केले.
- पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणार
महाराष्ट्राच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पोलिसांची संख्या पाहिजे. त्यासाठी आगामी काळात पोलीस भरतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ही भरती लवकरात लवकर कशी होईल, याबाबत सरकार विचारधीन असल्याचेही सांगितले. स्वागत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले तर आभार अप्पर अधीक्षक रितु खोखर यांनी मानले.
- पोलीस मुख्यालयाचे काम सोनाई इन्फ्राने अत्यंत चांगले आणि वेळेत केले
पोलीस मुख्यालयाचे काम अत्यंत चांगले आणि वेळेपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोनाई इन्फ्राचे प्रमुख श्रीनिवास पाटील, अजिंक्य पाटील यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. इमारतीचे आर्किटेक्ट मोहित चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला. ही इमारत देखणी झाली आहे. अशाच प्रकारच्या अनेक इमारती पोलीस गृहनिर्माणकडून बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- दोन लाख घरांची गरज
महाराष्ट्रात पोलिसांसाठी एकूण 2 लाख घरांची गरज आहे. पण सध्या फक्त 90 हजार घरेच निर्माण झाली आहेत. यापुढील काळात ही घरे पूर्ण केली जातील. त्यासाठी गृहनिर्माण विभागाला मोठ्याप्रमाणात पैसा देण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे पोलीस अंमलदारांना घरासाठी वेगळ्या ठिकाणी राहावे लागणार नाही.
- रिमोटव्दारे केले उदघाटन
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे तसेच इतर सर्व कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिमोटरव्दारे केले. तसेच त्यांनी यापुढील काळात सांगलीसाठी आणखीन निधी देणार असल्याचेही आश्वासन दिले.








