वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आज गुरुवारपासून सुरू होत असून इंग्लंड संघ 2019 च्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केलेल्या आणि सध्या दुखापतीने त्रस्त असलेल्या न्यूझीलंडविऊद्धच्या सामन्यातून आपल्या जेतेपद राखण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. इंग्लंड संघात अनेक ज्येष्ठ खेळाडू असले, तरी चार वर्षांत तिसरा विश्वचषक मिळविण्याची ताकद जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघात आहे. ते विद्यमान ‘टी20’ विश्वचषक विजेते देखील आहेत.
दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी चिंतेच्या अनेक गोष्टी आहेत. सराव सामन्यांत खेळलेला कर्णधार केन विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज टिम साउदी हे संघात नसतील. कारण दोघेही शस्त्रक्रियांनंतर ठीक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातही साउदीच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष राहील. अहमदाबादची खेळपट्टी ही सामान्यत: फलंदाजांना पोषक असते आणि इंग्लंडकडे भक्कम फलंदाजी आहे. बेन स्टोक्सच्या पुनरागमनानंतर या ताकदीत आणखी वाढ झाली आहे. स्टोक्सला गुडघा त्रास देत असल्याने त्याची भूमिका कमी राहू शकते.
पण न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे स्टोक्स हा एकमेव अडथळा राहणार नाही. इंग्लंडची फलंदाजीतील फळी लांबलचक असून त्यांच्याकडे लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो आणि हॅरी ब्रूक यासारखे स्फोटक फलंदाज आणि ज्यो रूट आणि डेविड मलानसारखे पारंपरिक पद्धतीने खेळणारे फलंदाज आहेत. याशिवाय त्यांच्याकडे मोईन अली, ख्रिस वोक्स आणि सॅम करनसारखे अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांनी गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषकात निर्णायक भूमिका बजावली होती.
गोलंदाजीत मार्क वुडचा वेग आणि आयपीएलचा अनुभव इंग्लंडला धार देईल. लेगस्पिनर आदिल रशिद हा देखील एक महत्त्वाचा गोलंदाज असेल. तथापि, इंग्लंडला जोफ्रा आर्चरची उणीव भासत आहे. हा वेगवान गोलंदाज दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे, विल्यमसन आणि साउदी नसल्याने न्यूझीलंडला निश्चितपणे अनुभवाची उणीव भेडसावेल. सलामीला डॅरिल मिशेलचा फॉर्म आणि भक्कम डेव्हॉन कॉनवे यांच्यामुळे न्यूझीलंडला आत्मविश्वास मिळेल. मात्र हंगामी कर्णधार टॉम लॅथमची दुबळी कामगिरी ही चिंतेची बाब ठरू शकते. जेम्स नीशम आणि ग्लेन फिलिप्स हे त्यांच्याकडील ‘हार्ड-हिटर्स’ असून विल यंगने यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 578 धावा केल्या आहेत आणि तो किवींना तिसऱ्या क्रमांकावर एक ठोस पर्याय देऊ शकतो.
संघ इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), ज्यो रूट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशिद, मार्क वुड , रीस टोपली, गस अॅटकिन्सन.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, केन विल्यमसन (इंग्लंडविऊद्ध उपलब्ध नाही), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी (तंदुरुस्तीसंदर्भात निरीक्षणाखाली), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री.









