माणूस जेव्हा काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार करतो तेव्हा तो सर्व अडथळय़ांवर मात करत यश मिळवत असतो. जॉन डॉड नावाच्या एका इंजिनियरने हे सिद्ध करून दाखविले आहे. जॉन यांनी एक अत्यंत अनोखी कार तयार केली आहे. पॉल जेम्सन यांनी ‘द बीस्ट’ नावाच्या एका कारची निर्मिती केली होती. या मजबूत कारचे नाव पुढील काळात गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले होते. परंतु ही कार तयार करण्याची प्रक्रिया निश्चितच सोपी नव्हती. कारमध्ये रणगाडय़ाचे इंजिन बसविल्यास काय घडेल हे पॉल पाहू इच्छित होते. याकरता त्यांनी कारसाठी कस्टम चेसिस तयार केली, ज्याला कारची बॉडी म्हटले जाते. त्यावर रॉल्स रॉयस मेटियोर रणगाडय़ाचे इंजिन जोडले. यानंतर पॉल यांनी ट्रान्समिशन एक्सपर्ट जॉन डॉड यांच्याकडे जात कारसाठी ऑटोमेटेड ट्रान्समिशन तयार करण्याची सूचना केली होती.
पॉल यांनी काही काळासाठी या कारच्या निर्मितीचा प्रयोग रोखला होता, परंतु जॉन यांना ही कल्पना अत्यंत आवडल्याने त्यांनी हा प्रकल्प पॉल यांच्याकडून खरेदी करत स्वतःच कारची निर्मिती पूर्ण केली. जॉन यांनी कारसाठी कस्टम फायबर ग्लास बॉडी तयार केली, ज्यात इंजिन बसविले. 1972 मध्ये जॉन डॉड यांनी द बीस्टची निर्मिती पूर्ण केली होती. या कारचा लुक आणि त्यातील वैशिष्टय़े लोकांना आवडत होती. ही कार टूरवरून 1974 मध्ये स्वीडनमधून परत असताना यात आग लागली. या दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झाल्यावरही जॉन यांनी पुन्हा कार निर्मितीचा निश्चय केला होता.

परंतु त्यांनी यावेळी वेगळाच चमत्कार केला. नव्या कारमध्ये विमानाचे इंजिन जोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि याकरता रॉल्स रॉयस मर्लिन व्ही12 इंजिनची निवड केली, जे स्पिट फायर आणि हरीकेन लढाऊ विमानात दुसऱया महायुद्धावेळी वापरण्यात आले होते. दुसरी कार अत्यंत शक्तिशाली ठरल्याने 1977 मध्ये याच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेला. कारचा कमाल वेग 418 किलोमीटर प्रतितास इतका असल्याची चर्चा रंगू लागली होती.
डॉड यांनी स्वतःच्या या कारची कधीच विक्री केली नव्हती. परंतु मागील वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यावर कुटुंबाने ही कार विकण्याचा निर्णय घेतला होता. या कारने आतापर्यंत केवळ 16 हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. अलिकडेच या कारचा लिलाव झाला असून तिला 72 लाख रुपयांची किंमत प्राप्त झाली आहे.









