‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर एलअँडटी ला जाग
बेळगाव : एल अँड टी कडून 24 तास पाण्यासाठी गवळी गल्लीत खोदकाम करण्यात आल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याबाबत ‘तरुण भारत’मधून बातमी प्रसिद्ध होताच जागे झालेल्या एल अँड टी ने शुक्रवारी चर बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. पावसामुळे चिखल निर्माण झाल्याने याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत होता. मात्र, ‘तरुण भारत’ने याबाबत आवाज उठविल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी एल अँड टी कडून शहर व उपनगरात जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, खोदलेल्या चरी तातडीने बुजविल्या जात नसल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे. जलवाहिनी घालण्यासाठी गवळी गल्लीत खोदकाम करण्यात आले होते. मात्र, तातडीने चरी बुजविण्यात न आल्याने पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली होती. एल अँड टी च्या या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, शुक्रवारी तातडीने चरी बुजविल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.









