पुणे / प्रतिनिधी :
विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या अर्जाबाबतचा आजचा जो काही घटनाक्रम तुम्हाला वाटतो, तसा तो प्रत्यक्षात नाही. योग्यवेळी तो तुमच्यासमोर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. तांबे यांचे काम चांगले आहे. मात्र, धोरणानुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते बोलत होते. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमध्ये काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून गुरुवारी मोठे राजकीय नाटय़ पहायला मिळाले. या सर्व प्रकरणामागे भाजपा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती असल्याचेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, याबाबत प्रदेशाध्यक्षांनी काल काय ते सांगितले आहे. योग्य वेळी योग्य निर्णय करू. एक नेते, व्यक्ती, युवा नेते म्हणून निश्चितपणे सत्यजीत तांबे यांचे काम चांगले आहे. परंतु, सर्व राजकीय निर्णय हे योग्य वेळी करावे लागतात. धोरणाप्रमाणे करावे लागतात. बावनकुळे यांनी हे सांगितलेच आहे.
सत्यजीत तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे आणि भाजपने तिथे उमेदवार न देणे, यामागे पक्षाचे वेगळे गणित आहे का, असा सवाल केला असता आम्ही कोणतेही गणित घडविलेले नाही. मी तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो. त्याला बाळासाहेब थोरात तसेच सर्वच पक्षांचे नेते होते. आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाला जात असतो. हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही. योग्य वेळी तो समोर येईलच.
शेवटी आम्हीदेखील कोण उमेदवार द्यावा, या प्रयत्नात होतो. आमची मनापासून इच्छा होती, की राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी. त्यासंदर्भात राजेंद्रजी व राधाकृष्ण यांच्याशी आमची चर्चाही सुरू होती. मात्र, त्यांनी याबाबत असमर्थता दाखविली. अन्यथा, आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते, असेही फडणवीस यांनी नमूद केले.








