आयआयटी मद्रासचे प्रा. कामकोटी यांचे प्रतिपादन : व्हीटीयूचा 23 वा दीक्षांत सोहळा : बेंगळूरचा मदकसीरा विकास 13 सुवर्ण पदकांचा मानकरी
बेळगाव : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय कामगिरी करत जगात आपला ठसा उमटविला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. विद्यार्थी सातत्याने केलेल्या परिश्रामानेच यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन मद्रास येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. व्ही. कामकोटी यांनी केले.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) चा 23 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी व्हीटीयूच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. कामकोटी बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गेहलोत, डॉ. ए. व्ही.एस. मूर्ती, आदी चुंचनगिरी मठाचे मठाधीश निर्मलानंद स्वामीजी, एच. एस. शेट्टी यासह इतर उपस्थित होते. डॉ. कामकोटी म्हणाले, डिजीटल युगात भारताने प्रवेश केला आहे. आज सर्वत्र डिजीटल पेमेंट सिस्टीम, आधारच्या साहाय्याने नोंदणी प्रक्रिया केली जात आहे. सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर होत असून ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत आता हे ज्ञान पोहोचले आहे. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. नोकऱ्या शोधण्याऐवजी रोजगार निर्माण कसा होईल व त्यातून देशाचा विकास कोणत्या माध्यमातून होईल याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, विद्यार्थ्यांनी पदवीनंतर रोजगार निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी असून नजीकच्या काळात ती तिसऱ्या क्रमांकावर येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांना मानद डॉक्टरेट प्रदान
व्हीटीयूमधून यावर्षी 42 हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. त्यापैकी निवडक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर आदी चुंचनगिरी महासंस्थान मंडळाचे जगद्गुरू डॉ. श्री निर्मलानंद स्वामीजी, राष्ट्रीय शिक्षण समिती ट्रस्टचे मानद सचिव डॉ. ए. व्ही. एस. मूर्ती व म्हैसूर येथील मेक्रॉन टाईल्स कंपनीचे अध्यक्ष एच. एस. शेट्टी यांना मानद डॉक्टरेट देण्यात आली. कुलगुऊ प्रा. एस. विद्याशंकर यांनी विद्यापीठाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पीएचडी, सुवर्णपदक व विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बेंगळूर येथील मदकसीरा विकास या विद्यार्थ्याने 13 सुवर्ण पदकांवर आपली छाप उमटविली. तर बेळगावच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेजची विद्यार्थिनी अवंतिका सावकार हिने पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. यावेळी मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार बी. ई. रंगास्वामी, वित्त अधिकारी टी. एन. श्रीनिवास यासह इतर उपस्थित होते.
व्हीटीयूमधून जीआयटीच्या आठ जणांना पीएचडी
व्हीटीयूचा 23 वा दीक्षांत सोहळा मंगळवारी पार पडला. यामध्ये केएलएस जीआयटी कॉलेजच्या प्राध्यापकांनी पीएचडी संपादन केली. एकूण आठ प्राध्यापकांनी पीएचडी संपादन केली आहे. तुषार तुकाराम हावळ यांनी पीएचडी संपादन केली. त्यांना जीआयटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. महारुद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. रमेश बी. कोटी यांनी पीएचडी संपादन केली असून त्यांना डॉ. महाबळेश्वर एस. के. यांचे मार्गदर्शन मिळाले. सागर संताजी यांनी पीएचडी मिळविली असून डॉ. वीणा देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. परुतगौडा खानगौडर यांनी डॉ. जी. एम. पाटील व डॉ. दिनेशा एच. ए. यांच्या मार्गशर्दनाखाली पीएचडी मिळविली. डॉ. अंजना जोशी यांनी डॉ. पी. आर. हंपीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संपादित केली. हरिष रेवणकर यांनी डॉ. प्रसन्ना कौजलगी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळविली. शैलजा माळी यांनी डॉ. किरण थाबाज यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संपादित केली. विराट गिरी यांनी डॉ. एम. एम. मठ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळविली. कॉलेजचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन, प्राचार्य डी. ए. कुलकर्णी, डॉ. श्वेता गौडर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.









