उद्योगमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीतील डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात संकल्प
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ाने 6 भारतरत्न या देशाला दिले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते, डॉ. पांडुरंग काणे कोण होते, महर्षी कर्वे कोण होते. ते भारतरत्न पुढच्या पिढीला पहायला मिळायला पाहिजेत. म्हणून देशातला पहिला ‘भारतरत्न प्रकल्प’ रत्नागिरीत करण्याचा संकल्प राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी डॉ. आंबेडकर जयंतीदिनी केला.
रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या जयंती महोत्सव सोहळय़ाच्या सभेत पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी स्मारक समिती अध्यक्ष एल. व्ही. पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेटय़े, जि. प. माजी उपाध्यक्ष उदय बने, शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप, काँग्रेसचे हारिस शेकासन तसेच गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, दीपक जाधव, विठ्ठल सावंत, बी. के. कांबळे, बा. ज. पवार आदी उपस्थित होते.
रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी होती. त्यानुसार शक्य असेल ते पुतळय़ासाठी केले जाईल, असा संकल्प सोडला होता. पण आज समाधान वाटतेय की, त्या पुतळय़ासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करून आपण आलो असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी यावेळी जाहीर केले. त्या पुतळय़ासाठी डॉ. आंबेडकर टेक्निकल इन्स्टिटय़ूट लोणेर येथे कदम नामक व्यक्तीने जो पुतळा बनवला, त्याच व्यक्तीला रत्नागिरीतील डॉ. आंबेडकर यांच्या पंचधातूच्या पुतळय़ासाठी आपण स्वतः ऑर्डर दिल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यासाठी कोणताही शासकीय निधी खर्च करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. फक्त पुतळा उभारणीच्या ठिकाणी शासकीय निधी खर्च केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील सामाजिक न्यायभवन येथे उभारण्यात येणाऱया या पुतळय़ाचा लोकार्पण सोहळा पुढच्या 14 एप्रिल 2024 मध्ये सर्वांच्या उपस्थितीत करणार असल्याचे घोषित केले.
रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्याच्यावतीने सुरू असलेला हा जयंती कार्यक्रम चांगल्या पध्दतीने कायम सुरू रहावा, अशी संकल्पना तत्कालीन दिवगंत अध्यक्ष बी. व्ही. पवार यांची होती. त्यानुसार डॉ. बाबासाहेबांचे विचार आज सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयास चालू आहे. त्या कार्यासोबत आम्ही सर्व राजकीय मंडळी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले. येथे आयोजित सभेला मनीष मोहिते, शिवराम कांबळे, स्मिता कांबळे, दीपाली जाधव यांच्यासह स्मारक समितीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. 14 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्य़ाजवळ हा कार्यक्रम मोठय़ा भावनेने व उत्साहात साजरा झाला. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी शेकडोंचा जनसमुदाय लोटला होता. सकाळपासूनच येथे आंबेडकरप्रेमी जनतेने, त्यांच्या अनुयायांनी, लोकप्रतिनिधींनी, राजकारणी यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्ये ‘राष्ट्रपुरूष माहिती’ उपक्रम
राष्ट्रपुरूषांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, ती कायमस्वरूपी रहावी, त्यात छ. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आदींचे समाजाप्रती असलेले दीपस्तंभासारखे दिशादर्शक कार्य समोर राहिले आहे. जिल्हय़ातील प्रत्येक माध्यमिक शाळेत जेवढे राष्ट्रपुरूष होऊन गेले, त्यांची माहिती नियोजन मंडळाच्या माध्यमातून देणार आहे आणि हा राज्यातील पहिलाच उपक्रम असेल, असाही संकल्प पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केला.









