अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अविश्वास प्रस्तावाला उत्तर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात बोलताना विरोधकांना फटकारले. सध्या जागतिक पातळीवर अस्थिरता असतानाही भारत वेगाने प्रगती करत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप सरकारने भारताला नाजूक अर्थव्यवस्थेतून सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत बदलले आहे. आता भारत पोकळ आश्वासनांना बळी पडत नाही. मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारने अनेक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणल्यामुळे देश आज जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मणिपूरच्या मुद्यावरून विरोधकांनी भाजप सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर सध्या संसदेत चर्चा सुऊ आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेसंबंधी अनेक मुद्दे सादर करत विरोधकांच्या आरोपांची पोलखोल केली. विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी आता भारत पोकळ आश्वासनांच्या युगात जगत नाही. परिवर्तन हे शब्दांतून नव्हे तर प्रत्यक्षात होते. तुम्ही लोकांना स्वप्ने दाखवलीत. आम्ही तुमची स्वप्ने सत्यात उतरवली. आमचा सर्वांना सशक्त बनवण्यावर विश्वास असल्यामुळेच लोकही आमच्यावर विश्वास ठेवत आहेत, असे वक्तव्य निर्मला सितारामन यांनी लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान केले.
भारत आता कमकुवत अर्थव्यवस्थेतून वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थेत बदलला आहे. उच्च चलनवाढ आणि कमी विकास दर या दुहेरी आव्हानांशी जागतिक अर्थव्यवस्था झगडत आहे. भारत मात्र इतर देशांना योग्य सहकार्य करत दमदारपणे पुढे जात असल्याचा निर्वाळा अर्थमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी युरोझोन, चीन आणि इतर राष्ट्रांमधील कठीण काळातील उदाहरणेही दिली. आम्ही ‘बनेगा, मिलेगा’सारखे शब्द आता वापरत नाही. आजकाल लोक ‘बन गये, मिल गए, आ गये’ असे शब्द वापरत असल्याचे अर्थमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात लोक ‘बिजली आएगी’ म्हणायचे, आता लोक म्हणतात ‘बिजली आ गयी’. आधी ते म्हणायचे ‘गॅस कनेक्शन मिलेगा’, आता ते ‘गॅस कनेक्शन मिल गया’… असे म्हणतात. विमानतळ ‘बनेगा’ असे नाही तर विमानतळ ‘बन गया’ असे म्हणतात, असे विविध दाखले अर्थमंत्र्यांनी दिले.









