वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवार, 7 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण असल्याने आकाशात ‘ब्लड मून’चा अद्भूत नजारा निदर्शनास येणार आहे. हे ग्रहण 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन मध्यरात्री उशिरा संपेल. रविवारी रात्री 8:58 वाजता चंद्रग्रहण सुरू होऊन मध्यरात्री 1:26 वाजता संपणार असल्याचे तज्ञांनी सांगितले. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक काळ वैध असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असल्याने त्याला ‘ब्लड मून’ म्हणून ओळखले जाईल. ‘ब्लड मून’चे दर्शन रात्री 11 वाजल्यापासून सुरू होईल. या दुर्मिळ घटनेदरम्यान चंद्र पृथ्वीच्या सावलीतून गेल्यामुळे चंद्र हळूहळू लाल आणि नारिंगी रंगात चमकेल. त्यानंतर हे ग्रहण एकूण 82 मिनिटे चालेल. ग्रहण संपल्यानंतर सुतक काळ देखील संपतो. धार्मिक मान्यतेनुसार सुतक काळात पूजा आणि शुभ कार्ये करण्यास मनाई आहे.









