अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर हालचालींना वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांची सेवानिवृत्ती आणि अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगात पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी 15 मार्चपर्यंत दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच गोयल यांनी शुक्रवारी सकाळी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत याची घोषणा केली आहे. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे एकमात्र सदस्य राहिले आहेत.
कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वात एक शोधसमिती प्रत्येकी 5 नावांच्या दोन याद्या तयार करणार आहे. या समितीत गृह सचिव आणि कार्मिक तसेच प्रशिक्षण विभागाचे सचिव सामील असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत एक केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी सामील असणार आहेत. ही निवड समिती निवडणूक आयुक्ताच्या स्वरुपात नियुक्तीसाठी दोन जणांची नावे निश्चित करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाणार आहे. निवड समिती सदस्यांच्या सुविधेनुसार 13 किंवा 14 मार्च रोजी बैठक घेऊ शकतात तर संबंधित नियुक्त्या 15 मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.
नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. तर सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाची लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांसोबत बैठक होणार आहे. निवडणूक तयारीसंबंधी आयोग लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांना दिशानिर्देश देणार आहे.









