विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे ही कमजोरी : सीडीएस अनिल चौहान यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘जुन्या शस्त्रास्त्रांनी आजचे युद्ध जिंकता येत नाही’ असे स्पष्ट करतानाच भारताच्या संरक्षण सज्जतेमध्ये आत्मनिर्भरतेची गरज संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी अधोरेखित केली आहे. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे आपल्याला कमकुवत बनवत आहे. अन्य देशांवर निर्भर राहणे ही आपली कमजोरी असून देशालास्वदेशी प्रगत तंत्रज्ञान आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित यूएव्ही आणि सी-यूएएसचे प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
सीडीएस अनिल चौहान यांनी युद्धात तंत्रज्ञान विकास आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्याने आपली युद्धसज्जता कमकुवत होते. जुन्या काळातील शस्त्रास्त्रांनी आपण आजचे युद्ध जिंकू शकत नाही. तसेच परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे आपल्या युद्ध तयारीला कमकुवत करते. ते आपल्याला कमजोर बनवत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले असून देशाच्या सुरक्षेसाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल, असेही सीडीएस चौहान यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने नि:शस्त्र ड्रोनचा वापर केला. भारताने शत्रूराष्ट्राचे बहुतेक ड्रोन पाडले. पाकिस्तानचे हल्ले आपल्या कोणत्याही लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान करू शकले नाहीत. भारतीय सैन्याने ड्रोनचा क्रांतिकारी वापर केला. या युद्धात ड्रोनचा वापर खूप क्रांतिकारी पद्धतीने करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापुर्वीही चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील एका व्याख्यानात भारताच्या यशस्वी कामगिरीचा उल्लेख गौरवाने केला होता.
आयातीवर अवलंबून राहणे अयोग्य
आपण आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही, कारण ते आपल्या युद्ध आणि संरक्षण कार्यांसाठी महत्त्वाचे आहे. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली तयारी कमकुवत होते. उत्पादन वाढवण्याची आपली क्षमता कमी होते. यामुळे महत्त्वाच्या यांत्रिक भागांची कमतरता निर्माण होते, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्टपणे नमूद केले.









