वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यातून 41 मजुरांना सुखरुप बाहेर काढणाऱ्या बचाव मोहिमेवर झालेला खर्च याची निर्मिती करणारी कंपनी नवयुगा उचलणार आहे. याकरता राष्ट्रीय महामार्ग आणि अवसरंचना विकास निगम लिमिटेड (एनएचआयडीसीएल) खर्चाचा तपशील तयार करत आहे.
12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात ढिगारा कोसळल्याने 41 मजूर अडकून पडले होते. या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. देशभरातील 12 हून अधिक यंत्रणा, वैज्ञानिक, तज्ञांच्या पथकाने मोहिमेच्या 17 व्या दिवशी यश मिळविले होते. परंतु यादरमयान अमेरिकन ऑगर मशीनपासून प्लाझ्मा कटर, लेझर कटर, ड्रिलिंग मशीन, रोबोट समवेत अनेक यंत्रसामग्री मागविण्यात आली होती.
अनेक यंत्रांना चिनूक हेलिकॉप्टर तर काही यंत्रांना हवाईमार्गाद्वारे इतर राज्यांमधून जौलीग्रांट विमानतळावर आणले गेले होते. याकरता मोठा खर्च झाला असण्याचा अनुमान आहे. एनएचआयडीसीएल आता या पूर्ण बचावमोहिमेत झालेल्या खर्चाचा तपशील जमवित आहे. मोहिमेत्वर झालेला खर्च कंपनी उचलणार आहे, परंतु या मोहिमेवर किती खर्च झाला याचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नसल्याचे एनएचआयडीसीएलचे संचालक अंशु मनीष खल्खो यांनी सांगितले आहे.सिलक्यारा बोगद्यात कैद झाल्यावर मजुरांनी प्रारंभी स्वत:च्या दिशेने ढिगारा हटविण्याचा प्रयत्न केला होता. याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.









