कुणालाच दिसत नाही हे घर
तुम्ही एकाहून एक आलिशान घरांबद्दल ऐकले असेल. राजमहालांच्या भव्यतेपासून आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती जगभरात आहेत. परंतु कुणालाच न दिसणाऱ्या घराबद्दल कधी ऐकले आहे का? एक घर काचेच्या मदतीने अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की ते स्वत:च्या लँडस्केपमध्ये पूर्णपणे हरवून जाते. याचमुळे या घराचे नाव देखील ‘अदृश्य’ ठेवण्यात आले आहे.

या घराला विक्रीसाठी एअरबीएनबीच्या वेबसाइटवर नोंदणीकृत करण्यात आले आहे. याची किंमत 18 दशलक्ष डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत 150 कोटी रुपये इतकी आहे. हे घर अमेरिकेच्या जोशुआ ट्री डाउनटाउनमध्ये तयार करण्यात आले आहे. स्वत:च्या प्रचंड किमतीमुळे हे एअरबीएनबीवर नोंदणीकृत जोशुआ ट्रीची सर्वात महाग मालमत्ता आहे. काचेने तयार झालेले हे मॉडर्न आर्किटेक्चर 67.5 एकरमध्ये फैलावलेले आहे. यात 5,500 चौरस फुटांची लिव्हिंग स्पेस आहे. हे घर जोशुआ ट्री नॅशनल पार्कनजीक आहे.

या घरात अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या असून यात 3 बेडरुम्स, 4 बाथरुम्स आणि 100 फुटांचे इनडोअर स्वीमिंग पूल सामील आहे. या घराच्या निर्मितीवेळी पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. इनव्हिजिबल हाउस रुफटॉफ सोलर सिस्टीमने युक्त आहे. याच्या छतरावर सोलर पॅनेल बसविण्यात आले असून याद्वारे घराच्या गरजा पूर्ण होतील इतकी वीज निर्मिती होऊ शकते.
या घराचे डिझाइन चित्रपट निर्माते क्रिस हॅनली यांनी केले आहे. तेच या घराचे मालक आहेत. हॅनली यांना विक्रीपासूनच या घरापासून उत्पन्न मिळत आहे. अनेक ठिकाणाहून लोक हे घर पाहण्यासाठी येत असून छायाचित्रे काढून घेत आहेत. याकरता हॅनली त्यांच्याकडून शुल्क आकारत आहेत.









