महापौर-उपमहापौर निवडीबाबत केली चर्चा : लवकरच निवड करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
निवडणुका होऊन सव्वा वर्ष होत आले तरी अद्याप महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. 21 व्या कार्यकालावधीनुसार महापौर-उपमहापौर निवड करण्याचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने दिले आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक तातडीने घ्यावी, अशी विनंती करण्यासाठी अपक्ष नगरसेवकांनी बुधवारी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली.
नगरसेवकांनी भेट घेऊन चर्चा केली असता महापौर-उपमहापौर निवडीची तारीख गुरुवारी निश्चित करून लवकरच निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी नगरसेवकांना दिली. महापौर-उपमहापौर निवडणूक झाली नसल्याने नगरसेवकांना कोणतेच अधिकार प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निधीचा विनियोग करणे अशक्य बनले आहे. सध्या शहरातील नागरिक तक्रारी घेऊन नगरसेवकांकडे येत आहेत. पण समस्यांचे निवारण करण्याचा अधिकार नगरसेवकांना नाही. परिणामी शहरवासियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक गल्लीतील समस्यांबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करीत आहेत. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवड करून नगरसेवकांना अधिकार द्यावेत, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
महापौर-उपमहापौर निवड नाही आणि नगरसेवकांना अधिकार नसल्याने शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक समस्या निर्माण होत असून, याबाबत कोणाकडे दाद मागायची, असा मुद्दा उपस्थित होत आहे. निवडणुका का घेतल्या जात नाहीत, अशी विचारणा अॅड. प्रभू यत्नट्टी यांनी केली. तसेच निवड प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी विनंती केली. याबाबत शासनाकडून पत्र आले असून, गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, पूजा पाटील, बाबाजान मतवाले, बसवराज मोदगेकर, रियाज किल्लेदार, अॅड. प्रभू यत्नट्टी आदी उपस्थित होते.









