आरोग्य स्थायी समितीच्या नगरसेवकांनी दिला आंदोलनाचा इशारा
बेळगाव : तुरमुरी कचरा डेपो येथे टेंडरच्या माध्यमातून 26 लाखांचे काम कंत्राटदारांना देण्यात आले आहे. मात्र हे देताना आम्हाला कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहोत की नाही? असा प्रश्न आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. आम्हाला जर उत्तरे मिळाली नाहीत तर सर्व नगरसेवक आयुक्तांच्या कक्षासमोर धरणे धरणार, असा इशारा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांसह नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच गोची निर्माण झाली. तातडीने आयुक्तांशी बोलून पुढील बैठकीत याबाबत सर्व माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे आंदोलन करू नका, जे काही आहे ते आम्ही सर्व तुमच्यासमोर मांडू, असे उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी सांगितले. तुरमुरी डेपो येथे विविध प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. कचऱ्याचे विविध प्रकारे वर्गीकरण करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. हे प्रकल्प जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र अजून या कामाची बिले देण्यात आली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ही बिले द्यायची नाही, असे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी सांगितले. कचरा डेपोला लवकरच भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. एकूणच या कामावरून बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला.
अभ्यासदौऱ्याचा प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा
नगरसेवकांचा अभ्यासदौरा काढण्याबाबत आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांसाठी दौरा आवश्यक असून इंदूर किंवा विजयवाडा येथे काढण्याबाबत चर्चा झाली. मात्र हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. या अभ्यासदौऱ्यामध्ये किती जणांना सामावून घ्यायचे याबाबत साधकबाधक चर्चा झाली. मात्र नगरसेवकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्याबाबत ठरविण्यात आले.
प्रभागासाठी निधी कधी उपलब्ध होणार? : बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांचा सवाल
निधी उपलब्ध नसल्यामुळे प्रभागातील कामे अर्धवट आहेत. ही कामे अर्धवट असल्यामुळे नागरिक आम्हाला फोन करतात. तेव्हा या कामांना जबाबदार कोण? असे म्हणत नगरसेवकांनी बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दीड वर्षे झाली तरी आम्हाला निधी मिळाला नाही. त्यामुळे भविष्यात तरी निधी मिळणार की नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षा वाणी जोशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी निधी नसल्यामुळे अनेक कामे अर्धवट आहेत. ड्रेनेजच्या चेंबरला झाकण बसविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही निवडून येवून जर जनतेची कामे करत नसेल तर आमचा उपयोग काय? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.
यावेळी अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी निश्चितच निधी मिळेल. मात्र त्याला थोडा अवधी लागेल. समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. संबंधित वॉर्डच्या निरीक्षकांना याबाबत सूचना करावी. त्यानंतर त्या समस्या सोडविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारऱ्यांनी प्लॉटची नोंद करताना किंवा घर बांधणीसाठी परवाना घेताना रिंगरोडसाठी निधी गोळा करण्याबाबत सरकारने आदेश दिला आहे. तेव्हा त्याची तरतूद केली तर चांगले होईल. कारण हा निधी महापालिकेला विविध विकासकामांसाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर अध्यक्षांनी याबाबत प्रस्ताव तयार करून कौन्सिल सभेत ठेवून त्यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. कपिलेश्वर तलाव येथे पाहणी करून विविध कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी कपिलेश्वरकडे जावे लागणार असल्यामुळे लवकरच ही बैठक गुंडाळण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. कामे होत नसल्यामुळे समस्या निर्माण होत असून तातडीने निधीची तरतूद करा, अशी मागणी करण्यात आली.









