एल अॅण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल तीव्र संताप, शुध्द पाणी पुरवठा करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवर चांगलीच रंगली. तर या सभेमध्ये नगरसेविकेने नळांना येत असलेले दुषित पाणी घेऊनच सभागृहात प्रवेश केला. सभेवेळी आपल्या प्रभागामध्ये होत असलेला पाणी पुरवठा कशा प्रकारे दुषित आहे हे दाखवून दिले. यामुळे साऱ्याच नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याबाबच्या त्रुटी मांडल्या. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तातडीने शुध्द पाणी पुरवठ्याबरोबर निर्माण होत असलेल्या समस्या दूर करण्याची सूचना करण्यात आली.
शनिवारी महापालिकेच्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये वॉर्डक्रमांक 13 च्या नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी शिवाजीनगर, विरभद्रनगर यासह इतर परिसरात होत असलेला दुषित पाणी पुरवठा याबद्दल तक्रार नोंदविली. नळाला आलेले पाणी बॉटलमधून घेऊनच त्या सभागृहात आल्या होत्या. आम्ही येथे जनतेने निवडून दिल्यानंतर आलो आहे. त्यांच्या समस्या सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र अशा प्रकारे नळाला पाणी आले तर जनतेला काय उत्तर द्यायचे, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही आपल्या वॉर्डामध्येही अशाच प्रकारे दुषित पाणी येत असल्याचे सांगितले. यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एल अॅण्ड टी कंपनीला सूचना दिली जाईल, असे सांगितले. महापालिका इतर विभागाकडे बोट दाखविते. मात्र यामध्ये बेळगावची सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. तेंव्हा योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार राजू सेठ यांनीही याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महापौर शोभा सोमणाचे यांनी तातडीने याबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून पाणी समस्या दूर करण्याची सूचना केली आहे.









