कोल्हापूर :
गायीच्या दूधासाठी असणारे शासनाचे प्रतिलिटर पाच रुपये मिळणारे अनुदान योजनेला पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. अशातच गायीच्या दूध दरात प्रतिलिटर 3 रुपये कपात केल्यामुळे चाऱ्यासाठी तसेच औषधोपचार देखभाल खर्चासह पशुखाद्य दरामुळे व्यवसाय धोक्यात आला आहे. आज शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दूधाला उत्पादन खर्चाएवढा दर मिळत नाही, तरी देखील कोणतीही संघटना किंवा स्थानिक नेतृत्व आवाज उठवायला तयार नाही. दुधाचा दर कमी केला, पशुखाद्य दर वाढवले तर पूर्वीसारखे मोर्चे येत नाहीत. हा विविध प्रश्नावरील चळवळीचा आवाज थंडावल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
महाराष्ट्रात सरासरी 25 ते 26 रुपये गायीच्या दुधाला दर असताना कोल्हापूर जिह्यात हा दर प्रतिलिटर 30 रुपये होता. हा दर शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू केल्यावर जिह्यातील प्रमुख दूध संघानी प्रतिलिटर 33 रुपये केला. शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंतच अनुदान मंजूर केले होते, त्यामुळे यामध्ये तीन रुपये कपात केल्याने पुर्ववत 30 रुपये प्रतिलिटर गाय दूधाचा दर झाला आहे. शासनाने किमान 28 रुपये गाय दूध दर निश्चित केला आहे, त्यामुळे जिह्यात हा दर प्रति लिटरला 30 रुपये केल्याने दोन रुपये जादाच असल्याचा दावा केला जात आहे.
गाय दूधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान व 30 रुपयांपर्यंत झालेली दरवाढ लक्षात घेऊन गायीला लागणाऱ्या सरकी पेंडीचे दर 1600 ते 1800 रुपये झाले तर पशुखाद्याचे दर 1450 ते 1700 रुपये झाले. यात पशुखाद्याच्या दरावर कोणतेही निर्बंध नाहीत. गायीचा भाकड काळ कमी, दूध देण्याचा कालावधी जास्त, दूध देण्याचे प्रमाणही जास्त असले तरी गायीला नियमित पशुखाद्य, देखभाल औषधोपचाराचा खर्च देखील जास्त आहे. यासाठी लागणारा चारा, मनुष्यबळाचा खर्च पाहता काडीचाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. गाय दूधापासून निर्माण होणारे तूप वगळता दूध पावडर व अन्य दुग्ध पदार्थाच्या दरात देखील स्थिरता नसल्याने दूध प्रक्रिया संघ देखील दुग्ध पदार्थांचे दर कमी झाल्यावर गाय दूध खरेदी करण्यास मर्यादा येत आहेत.
पन्हाळा तालुक्यात गाय दुधाचे उत्पादन सुमारे 2 लाख लिटर प्रतिदिन आहे. श्री वारणा दूध उत्पादक प्रक्रिया संघाकडे गाय दुधाचे दैनंदिन 3 लाख 75 हजार लिटर संकलन केले जाते. गोकुळसह अन्य दूध संघांकडे मिळून 10 लाख लिटर प्रतिदिन गाय दूध संकलन होत असून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी दूध व्यवसायातील तोटा सहन करावा लागत असल्याने याकडे पाठ फिरवली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतीपूरक व्यवसाय असलेल्या दुधाला दर मिळावा म्हणून शेतकरी संघटनांनी स्थानिक पातळीवर आवाज उठवला होता.
आज दूधाला उत्पादन खर्चाएवढा दर मिळत नाही, तरी देखील कोणतीही संघटना किंवा स्थानिक नेतृत्व आवाज उठवायला तयार नाही. यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक गोकुळ दूध संघ चालवत असताना दुधाचा दर कमी झाल्यावर तसेच पशुखाद्याचे दर वाढल्यावर अनेक संघटनांचे मोर्चे गोकुळवर यायचे. आता गोकुळने दुधाचा दर कमी केला, पशुखाद्य दर वाढवले तर पूर्वीसारखे मोर्चे येत नाहीत. हा चळवळीचा आवाज थंडावल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.
जाहीर केलेले अनुदान प्रत्यक्षात कधी मिळणार ?
गगनबावडा : तालुक्यात 42 महसूल गांवे व 29 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यात सुमारे 150 सहकारी दूध संस्था कार्यरत आहेत. पूर्व भागाच्या तुलनेने पश्चिम भागात दूध उत्पादन कमी होते. गेल्या काही वर्षांपासून जर्सी गायीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रोज येथे सुमारे 5000 लिटर इतके दूध संकलन होते. गाय दूध उत्पादन वाढीसाठी पाच रुपये अनुदान जाहीर केले. पण प्रत्यक्षात केव्हा मिळणार, हा संशोधनाचा विषय आहे.
सांगलीपेक्षा कोल्हापुरात दर जास्त, तरीही परवडत नाही
शिरोळ : तालुक्यात दररोज 80 ते 90 हजार लिटर गायीचे दूध संकलन होत असून गायीच्या दुधाला 30 रुपयांपासून ते 33 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. तालुक्यात गोकुळ दूध संघास रोज 70 हजार लिटर गायीचे दूध संकलन केले जाते. तीन ते साडेतीन फॅटच्या दुधाला 30 रुपयांपासून ते साडेपाच फॅटला 33 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. कोल्हापूर जिह्यापेक्षा सांगली जिह्यातील अनेक तालुक्यात गायीच्या दुधाचे दर 20 ते 25 रुपये प्रति लिटर दिले जाते. त्या मानाने कोल्हापूर जिह्यात 30 रुपये 32 रुपये दर दिला जातो. हाही दर परवडत नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.








