प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेच्या अर्थ विभागाच्या मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे या गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या रडारवर आहेत. गेली चार महिने घंटागाडीच्या ठेकेदाराकडून पालिकेत महिन्याच्या महिन्याला बिलाची मागणीच न केल्याने पालिकेकडूनही बिल देवू केले नाही. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न धुसफुसतो आहे. त्याबरोबर अनेक ठेकेदारांनी कामे केलेल्या कामांची बिलेही अडकली गेली आहेत. त्यातच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दि. 27 पर्यंत रजा काढली असल्याने बहुतांशी ठेकेदार वैतागले आहेत. दरम्यान, ठेकेदारांच्या बिलामधून जीएसटी कपातीची जोरदार स्पर्धा सुरु झालेली आहे.
पालिकेच्या विद्युत, बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, वृक्ष, भांडार आदी विभागातून विविध कामे शहरात केली जातात. त्या कामांपोटी अर्थ विभागातून काम करणाऱ्या ठेकेदारास बिल काढण्यात येते. झालेल्या कामांबाबतच्या तक्रारी, कामाची क्वॉलिटी, कागदपत्रांची पूर्तता पाहून संबंधित ठेकेदारांची बिले अदा केले जाते. परंतु अलिकडच्या काही दिवसांमध्ये अर्थ विभागाच्या प्रमुख आरती नांगरे या ठेकेदारांच्या रडारवर आहेत. नांगरे यांनी बीलच दिले नाही काय करु अशी ओरड बहुतांशी ठेकेदारांच्या तोंडून ऐकायला सातत्याने मिळते. तर काही ठेकेदार तर तक्रार कोणाकडे करायची असे म्हणून गप्प बसलेले असतात. घंटागाडीच्या ठेकेदारास सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. साशा कंपनीने पहिल्या वर्षी ठेका घेतला होता. तो ठेका अर्ध्यातच सोडून ती कंपनी पळून गेली. पुन्हा त्याच कंपनीच्या नावाने साताऱ्यातील काहींनी काम केले. अशीच कामे रेटून तर काही कागदावर केल्याची चर्चा वारंवार झाली होती.
अधिक वाचा : साताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही
बिलाची करावी लागतेय मागणी
परंतु अलिकडे ठेकेदारांचीच नुसतीच रडारड सुरु असते. ती म्हणजे आमचे बिल काढले जात नाही. घंटागाडीच्या ठेकेदाराकडून दर महिन्याला बिल मागणी करावी लागते. तसा हा ठेकेदार मागामागीच्या फंदात पडत नसल्याने चार चार महिने बिलच निघत नसल्याने कामगारांच्या पगाराचे वांदे होतात. त्यामुळे घंटागाडी कामागारांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली होती. अद्यापही त्यांना महिन्याचे मानधन दिले गेले नसल्याने कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. तर जीएसटीचा रकाना असल्याने जीएसटीची रक्कम बिलातून कापण्याची स्पर्धाच सुरु आहे. सध्या ठेकेदारांकडून एकच ओरड सुरु आहे ती म्हणजे मुख्याधिकारी अभिजित बापट हे दि. 27 पासून रजेवर गेल्याची. अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्याकडे कार्यभार आहे. परंतु त्यांना डिजीटल सहीचे अधिकार नसल्याने बिले रखडली.









