सेन्सेक्स 694 तर निफ्टी 213 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. यासह, गेल्या सहा व्यापार सत्रांमधील बाजारातील वाढीचा सिलसिलाही थांबला. यावेळी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या दिग्गज कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे बाजार खाली गेला. दरम्यान, शुक्रवारी जॅक्सन हॉल येथे होणाऱ्या केंद्रीय बँकेच्या वार्षिक आर्थिक बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून आले आहे.
बीएसई सेन्सेक्स 81,951 वर प्रभावीत होत खुला झाला. शुक्रवारी निर्देशांकात विक्रीचा सपाटा अधिक राहिल्याने अंतिम क्षणी सेन्सेक्स 693.86 अंकांनी घसरून निर्देशांक 81,306.85 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेर 213.65 अंकांनी घसरून 24,870.10 वर बंद झाला.
बाजारात घसरण होण्याचे कारण?
जगभरातील गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. कारण सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या आगामी निर्णयाकडे आहे. फेडरल रिझर्व्ह सदरच्या बैठकीत व्याजदराबाबत कोणता निर्णय घेते याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. गुरुवारी अमेरिकन बाजार कमकुवत होत बंद झाले. आशियाई बाजारांमध्येही संमिश्र कल दिसून आला.
टॅरिफची अंतिम मुदत जवळ
27 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या 25 टक्के यूएस टॅरिफबद्दल चिंता वाढल्या आहेत. यामुळे बाजारात अस्थिरता आणखी वाढली आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले, ‘ट्रम्पच्या टॅरिफशी संबंधित आव्हाने बाजारावर दबाव आणतील आणि गेल्या सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक लावू शकतात.’









