प्रतिनिधी /वास्को
झुआरी नदीवरील नवीन चौपदरी पुलाखाली धार्मिक प्रतिकाची उभारणी करण्याचे काम सुरू झालेले असून हा बेकायदा प्रकार गोव्यात वादंग वाजवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा प्रकार गोवा हिंदु रक्षा महाआघाडीनेही गांभिर्याने घेतला आहे. हा जमीन बळकावण्याचा प्रयत्न आहे. त्यामागे राजकीय वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त करताना महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हे बेकायदेशार काम त्वरीत थांबवण्यात यावे अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा ईशारा दिला आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी जनतेसाठी खुला झालेल्या झाआरीवरील नवीन चौपदरी पुलाखाली वास्को व मडगावहून पणजीच्या दिशेने जाताना पुलाच्या अगदी सुरवातीलाच मोकळय़ा जागेत क्रॉस उभारण्याचे बेकायदा काम तेजीत चाललेले आहे. या प्रकारामुळे कुठ्ठाळी सांकवाळ परीसरात आश्चर्य पसरलेले आहे.
बेकायदा खुरीस उभारणी रोखावी
यासंबंधी गोवा हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिध्दी पत्रक जारी करून हे काम त्वरीत थांबवण्याचे आवाहन केले आहे. सिमेंट काँक्रीटच्या वापराने नवीन पुलाजवळ बेकायदेशीररीत्या खुरीस उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत छोटय़ा खुर्सांचे रूपांतर कपेल व मोठय़ा चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या झालेले आहे ही वस्तुस्थीती आहे. राजकीय वरदहस्तानेच खूरीस उभारले जात आहेत असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. झुआरीच्या नव्या पुलाखाली निळय़ा आवरणात गुंडाळलेला खुरीस ठेवण्यात आलेला असून काँक्रीटचा पाया घालण्याचे काम जोरात सुरू आहे. सरकारने या बेकायदा प्रकरणात त्वरीत हस्तक्षेप करून हे काम थांबवावे. तो खुरीस तेथून हलवावा. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय बजरंग दल, गोवा शाखेनेही झुआरी पुलाखालील क्रॉस उभारणीच्या कामाला आक्षेप घेतला आहे. जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यापूर्वीच सरकारने हस्तक्षेप करून जमीन बळकावण्याचा हा प्रकार रोखावा व तेथील साहित्य जप्त करावे अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली आहे.









