आज भारत जगाचे नेतृत्व करतोय : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे गौरवोद्गार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आज भारत जगाचे नेतृत्व करण्यासाठी यशस्वीपणे मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारतीय संविधान आपल्या सामूहिक अस्मितेचा आधार असून ते आपणा सर्वांना एका कुटुंबासमान राहण्यासाठी प्रतिबद्ध करते, असेही त्या म्हणाल्या.
जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेला भारत, ज्ञान आणि बुद्धीचा उगम मानला जात होता. परंतु भारताला एका काळ्या काळातून जावे लागले… या दिवशी सर्वप्रथम मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या शूर योद्ध्यांचे आपण स्मरण करतो. यावर्षी आपण भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करत आहोत. राष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात ज्यांच्या भूमिकेला आता योग्य महत्त्व दिले जात आहे, अशा आघाडीच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी ते एक आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या केवळ सैद्धांतिक संकल्पना नाहीत ज्या आपल्याला आधुनिक युगात ओळखल्या गेल्या आहेत. ही जीवनमूल्ये नेहमीच आपल्या सभ्यता आणि संस्कृतीचा एक भाग राहिली आहेत. भारताची प्रजासत्ताक मूल्ये आपल्या संविधान सभेच्या रचनेत प्रतिबिंबित होतात, असेही त्यांनी सांगितले.
सरकारने सार्वजनिक कल्याणाची एक नवीन व्याख्या दिली आहे ज्यानुसार घर आणि पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत गरजा अधिकार म्हणून मानल्या गेल्या आहेत. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेद्वारे रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करून अनुसूचित जातीच्या लोकांची गरिबी झपाट्याने कमी केली जात आहे. सरकारने वित्त क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अचूकरित्या केलेला आहे. सर्वात उल्लेखनीय म्हणजे भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांच्या जागी भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू करण्याचा निर्णय आधुनिकतेच्या काळात अत्यावश्यक असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले. यशस्वी मार्गक्रमणामुळेच जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढले असून आपला देश जगाचे नेतृत्त्व करण्यासाठी पुढे सरसावत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.
प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन
आपल्या परंपरा आणि चालीरिती जपण्यासाठी आणि त्यामध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी संस्कृतीच्या क्षेत्रात अनेक प्रोत्साहनपर प्रयत्न केले जात आहेत. गुजरातमधील वडनगर येथे भारतातील पहिले पुरातत्वीय अनुभवात्मक संग्रहालय पूर्णत्वाच्या जवळ येत आहे. शिक्षणाच्या विविध स्तरांवर प्रादेशिक भाषांना शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. वाढत्या आत्मविश्वासासह भारत अनेक प्रयत्नांद्वारे अत्याधुनिक संशोधनात सहभाग वाढवत आहे, अस्sही राष्ट्रपती म्हणाल्या.
इस्रो शास्त्रज्ञांसह खेळाडूंचे कौतुक
आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अलिकडच्या काळात अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. विविध क्षेत्रात लक्षणीय आणि उल्लेखनीय प्रगती करून, आपण आपले डोके उंच ठेवून भविष्यात वाटचाल करत आहोत. 2024 मध्ये डी. गुकेश यांनी सर्वात तरुण विश्वविजेता बनून इतिहास रचल्याचा उल्लेखही राष्ट्रपतींनी केला.
देशवासियांना शुभेच्छा
देशाच्या प्रजासत्ताक दिनी आपण गांधीजींच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांचे तसेच सीमांमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचे मी अभिनंदन करते. न्यायपालिका, नागरी सेवा आणि परदेशातील आमच्या मिशनच्या सदस्यांचेही मी अभिनंदन करते, असे सांगत देशातील नागरिकांनाही राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.









