कला अकादमीच्या ब गट नाटय़ स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीने आयोजित केलेल्या 53 व्या मराठी ‘ब’ गट नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून दुर्वा थिएटर्स्, करमळी – तिसवाडी, यांनी सादर केलेल्या “द कॉन्शन्स’’ या नाटकास पन्नास हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. ॐ कलासृष्टी, बांदोडा – फोंडा यांच्या “श्रीमान योगी’ नाटय़प्रयोगास चाळीस हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच शिवम स्पोर्टस आणि कल्चरल क्लब, हळर्ण- पेडणे यांच्या ‘रण रागीणी’ या नाटकाची तीस हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. वीस हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक श्री विठ्ठल मंच सांगाती, कारापूर-साखळी यांच्या ‘नास्ती मातृसमः’ या नाटकासाठी देण्यात आले आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक सागर हळदोणकर याना द कॉन्शन्स या नाटकासाठी प्राप्त झाले असून शशिकांत नागेशकर याना श्रीमानयोगी नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक नीलेश नाईक यांना रण रागीणी या नाटकासाठी देण्यात आले.
पुरुष अभिनयात मोहिनीश प्रथम
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी मोहिनीश वेर्णेकर याना द कॉन्शन्स नाटकातील शाम या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून दुसरे चंद्रशेखर गवस याना इथे ओशाळला मृत्यू नाटकातील संभाजी भुमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके अविनाश नाईक (म्हातारा – म्हातारा पाऊस), अमोल नाईक (शिवाजी-श्रीमानयोगी), श्रीराम बाके (ब्रह्मानंद – नास्ती मातृसमः), राज परब (रतनसिंह-रणरागीणी), प्रसन्न केळकर (सुधुम्न – इला), श्रापुरुषोत्तम म्हार्दोळकर (ज्योतिबा – अंबरात फुले फुलली), स्वप्नील सावंत ( विश्वासराव – रणांगण), विशाल गवस (माधवराव – ही श्रींची इच्छा) व नवज्योत नाईक गांवकर (तरुण – गुरुवर्यम्) याना अभिनयाचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.
स्त्री अभिनयात विभा वझे प्रथम
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी विभा वझे यांना इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील येसूबाई भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून कु. सलोनी नाईक यानी श्रीमानयोगी नाटकातील पुतळाबाई या भुमिकेसाठी दुसरे पारितोषिक संपादन केले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके चैती कडकडे (म्हातारी – म्हातारा पाऊस), सौ. स्नेहल गुरव कारखानिस (रमाबाई – ही श्रींची इच्छा ), भिमा परब (पद्मीनी – रण रागीणी), प्रथमा महाले (मिरा – द कॉन्शन्स), रोहिणी कमलाकर (श्रध्दा – इला), दिपीक्षा गांवकर (सावित्री- अंबरात फुले फुलली), वेदश्री (शुभद्रांगी – नास्ती मातृसमः), शिल्पा (सोयराबाई – राजकारण) व सौ. सावळ लक्ष्मी महात्मे सातोर्डेकर अभिनयाचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले आले.
उत्कृष्ट नेपथ्यकार ज्ञानदीप विश्वास च्यारी
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक ज्ञानदीप विश्वास च्यारी यांना म्हातारा पाऊस नाटकासाठी प्राप्त झाले असून नवसो परवार याना गुरुवर्यम नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. द कॉन्शन्स या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी गोरक्षनाथ राणे यानी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्रक श्रीमानयोगी नाटकासाठी श्रवण नाईक याना देण्यात आले. वेषभूषेसाठीचे बक्षीस हंसराज परब याना रणरागीणी नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्रक सौ. दिप्ती बर्वे याना इला नाटकासाठी देण्यात आले.
उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक विजयेंद्र कवळेकर याना श्रीमानयोगी या नाटकासाठी प्राप्त केले असून योगेश धुरी याना द कॉन्शन्स या नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक शुभम पागी यानी नास्ती मातृसमः या नाटकासाठी संपादन केले, तर जितेंद्र परब याना रणांगण नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.
नाटयलेखनासाठी प्रथम पारितोषिक रणरागीणी या नाटकासाठी डॉ. वैशाली संजय नाईक यांना प्राप्त झाले असून दुसरे पारितोषिक संजय नंदा फाळकर यांनी नास्ती मातृसमः नाटकासाठी संपादन केले.
या स्पर्धेसाठी एकूण 20 प्रवेशिका विविध आल्या होत्या त्यातून 12 नाटके सादर झाली. स्पर्धेचे परीक्षण संदिप दत्तु नाईक गांवकर, अमर तुकाराम कुलकर्णी व नितीन कोलवेकर या परीक्षक मंडळाने केले.









