परंपरेचा गाभा सांभाळणारी, बदलत्या काळातील मारुती गल्ली
बेळगाव : शहराच्या वाढीव प्रगतीत आणि शहरी जीवनशैलीच्या रचनेत इथल्या विविध गल्ल्यांचा मोलाचा सहभाग आहे. या गल्ल्या केवळ निवासी विकासापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तर त्यांनी शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक पायाभूत मूल्यांची जपणूक करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’च्या माध्यमातून सुरू झालेली विशेष वृत्तमालिका “माझं वेणुग्राम” ही बेळगावच्या उल्लेखनीय गल्ल्यांची ओळख करून देणारा एक उपक्रम आहे. या मालिकेमध्ये शहरातील प्रत्येक गल्लीचा भूतकाळ, वर्तमान आणि भावी विकासदृष्टी यांचा परामर्श घेत एक वैविध्यपूर्ण सांस्कृतिक प्रवास उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या मालिकेचा आजचा तिसरा भाग “मारुती गल्ली” या ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध अशा गल्लीस समर्पित असून या गल्लीच्या वाटेवरून शहराच्या स्मृतींचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. कर्नाटकातील सीमाभागात वसलेले बेळगाव शहर हे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणारे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले जाते. येथील बाजारपेठ रेशमी साड्या, पालेभाज्या, कडधान्य, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, सुवर्ण व्यवसाय, तसेच ताजे दूध व लोणी यासाठी प्रसिद्ध आहे. परिणामी आठवड्याच्या शेवटी येथे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते. अशाच एका ऐतिहासिक आणि गतवैभव सांगणाऱ्या भागामध्ये वसलेली आहे- मारुती गल्ली. देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, हुतात्मा चौक आणि अनसूरकर गल्ली यांच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही गल्ली सध्या बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये येते.
श्री मारुती मंदिर- गल्लीतले श्रद्धास्थान
भारताच्या बहुतेक गावांप्रमाणे बेळगावातीलही बहुतांश भागात मारुती मंदिर आढळते. मारुती हा भक्तांचा रक्षक देव मानला जातो. मारुती गल्लीतील हे प्राचीन मंदिर पंचक्रोशीतील एक महत्त्वपूर्ण श्रद्धास्थळ मानले जाते. याच मंदिरामुळे या गल्लीला ‘मारुती गल्ली’ हे नाव प्राप्त झाले. मंदिरात प्रवेश करताच लाकडी कोरीव काम असलेला दरवाजा आणि त्यामागे भक्कम दगडी सभामंडप लक्ष वेधतो. गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली साडेचार ते पाच फूट उंच, उत्तराभिमुख श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे. डावा पाय गुडघ्यात दुमडलेला, डावा हात कंबरेवर आणि उजवा हात वर उंचावलेला अशा मुद्रा असलेली ही तेजस्वी मूर्ती दर्शन घेताच भक्त आपोआप नतमस्तक होतात.या मंदिराची पूजा बिर्जे-पुजारी कुटुंबाकडून पिढ्यान्पिढ्या केली जाते. साधारणत: साडेतीनशे वर्षांपूर्वी चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेल्या या मंदिरात दोन मजले असून सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना उंच दगडी ओटे आजही उठून दिसतात. मंदिर परिसरात दरवर्षी गोकुळाष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती यासारखे सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. पूर्वी येथे लग्नासाठी हॉल होता.
संतांचे पावन ठिकाण
या मंदिराचा परिसर केवळ धार्मिक केंद्र राहिलेला नाही, तर तो सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण ठरतो. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक संतांनी या मंदिरास भेट दिली आहे. यामध्ये श्री सिद्धारुढ स्वामींच्या परमशिष्या कलावती आई, दत्त संप्रदायातील श्रीधर स्वामी, पंतबाळेकुंद्री महाराज, काणे महाराज आदींचा समावेश आहे. स्वातंत्र्य लढा आणि सीमालढ्याच्या काळातही या मंदिरात विचारमंथन आणि बैठका पार पडल्या. इतकेच नव्हे तर पूर्वी न्यायनिवाड्याचे काम देखील येथे पार पडत असे, असा उल्लेख मंदिरात आजही पाहायला मिळतो.
वाड्यातून कॉम्प्लेक्सकडे : बदलती रचना
1970 च्या दशकात मारुती गल्लीतील रचना पूर्णपणे वेगळी होती. नरगुंदकर वाडा, दातार वाडा, जोग वाडा यासारखे प्रशस्त वाडे या गल्लीत होते. जोशी, दातार, लाटकर, गुमास्ते, कालकुंद्रीकर, कुलकर्णी, बिर्जे-पुजारी, कोरडे, कवीश्वर अशा कुटुंबांचे वास्तव्य या गल्लीत अजूनही मूळ धरून आहेत. कालांतराने या पारंपरिक रचनेची जागा आधुनिक व्यावसायिक संकुलांनी घेतली. बिळगी यांचे दुकान, महिला वास्तू भांडार, वसुंधरा कापड दुकान, बागी चेंबर्स, तारा चेंबर्स, इगल हाईट्स यासारख्या आधुनिक इमारती गल्लीत उभ्या राहिल्या. यामध्ये दवाखाने, मेडिकल्स, बँका, स्टेशनरी, फर्निचर, भांडी, कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, हॉटेल्स, लॉज, कॉस्मेटिक दुकाने, पुस्तकविक्री केंद्रे आणि पोस्ट ऑफिस यासारख्या विविध सेवा कार्यरत आहेत. सध्या या गल्लीत 300 ते 400 हून अधिक व्यावसायिक गाळे आहेत. शनिवार रविवारी येथे होणारी ग्राहकांची प्रचंड गर्दी हेच गल्लीतल्या आर्थिक घडीचे प्रतिबिंब आहे.
वारसा जपणाऱ्या हातांची एकजूट
जरी आधुनिकतेचा स्पर्श गल्लीत जाणवतो, तरीही इथल्या नागरिकांनी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपण्याचे काम सुरू ठेवले आहे. वार्षिक महापूजा, रथोत्सव, हरिपाठ सप्ताह यासारखे कार्यक्रम नियमित राबवले जातात. तरुण मंडळांमार्फत रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरं देखील घेतली जातात. धकाधकीच्या शहरी जीवनात ही गल्ली आजही शांततेचा आणि श्रद्धेचा कोपरा बनून राहिली आहे. याचे श्रेय येथे राहणाऱ्या नागरिकांच्या निष्ठेला, मंदिर समितीच्या सातत्यपूर्ण कार्याला आणि परंपरेबद्दलच्या आत्मियतेला द्यावे लागेल.
टिप- पुढील भागांमध्ये बेळगावातील इतर ऐतिहासिक गल्ल्यांची माहिती व कथा आपणास “माझं वेणुग्राम” मालिकेतून मिळत राहील. पुढील भागासाठी लक्ष ठेवा- ‘तरुण भारत’ युट्यूब चॅनल तसेच दैनिक आवृत्तीवर!
(“माझं वेणुग्राम” मालिका दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होईल.)









