बाल-शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष : विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी करण्याला प्रशासन-अधिकारी-समाजही जबाबदार
बेळगाव : लहान मुलांसाठी कसले आलेत हक्क आणि अधिकार, असे म्हणत लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना काही प्रश्न किंवा समस्या असतील असे पालकांना, समाजाला व प्रामुख्याने प्रशासनाला वाटतच नाही. त्यामुळे ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशीच सध्या त्यांची स्थिती झालेली आहे. त्यामुळे कधी त्यांना घेऊन जाणारी बस उलटू दे, कधी शाळेच्या दारात प्रचंड पाणी साचू दे किंवा चिखल होऊ दे, बसमध्ये त्यांना जागा नसू दे, त्यांच्या मनाचा किंवा परिस्थितीचा विचार सहसा होतच नाही. सध्या तरी महिलांना मोफत प्रवास असल्याने परिवहनच्या सर्व बस महिलांच्याच गर्दीने भरून जात आहेत. त्यामुळे दप्तर, पाण्याची बाटली, रेनकोट हे सर्व साहित्य घेऊन बसमधून प्रवास करणे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी कसरत झाली आहे. अपवादानेच आता विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये जागा मिळत आहे. पुन्हा गर्दी झाल्यानंतर बस थांब्यासमोर थांबलेल्या गर्दीने फुललेल्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालक बस पुढेच दामटतात, आणि पुढे पुढे जात असलेल्या बसमागे बिचारे विद्यार्थी दमछाक करत धावत जाताना दिसतात. रिक्षामध्ये किती विद्यार्थ्यांना बसवावे, याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. परंतु सरकारी योजनांमुळे सध्या रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे ते प्रामुख्याने वर्दीच्या रिक्षांवर अवलंबून आहेत. परिणामी रिक्षामध्ये अडचण होत असली तरीही बिचारे विद्यार्थी वर्दीच्या रिक्षातून प्रवास करतच असतात.
कोंडींमध्ये विद्यार्थ्यांची कुचंबना
प्रामुख्याने फिश मार्केटचा बसस्टॉप, आरपीडी बसस्टॉप, जिमखानानजीकचा बसस्टॉप तसेच चन्नम्मा सर्कलजवळील बसस्टॉपची एकदा परिवहन खात्याने आणि प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केल्यास विद्यार्थी कशा पद्धतीने जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत, याचा त्यांना अंदाज येईल. गर्दीने वाहणाऱ्या बस, अनियमितपणा आणि शाळेला होणारा उशीर अशा कोंडींमध्ये विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे.
शाळेपर्यंत पोहोचणे सर्कसच
शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत तर अनेक ठिकाणी आनंदच आहे. बहुसंख्य शाळांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची यंत्रणा नाही. मध्यंतरी पाणी टंचाईमुळे स्वच्छता गृहांमध्ये पाणी कोठून आणावयाचे, असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आणि शाळांनी काही दिवस वर्ग बंद करण्याचाही निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी सावगावजवळ शालेय बस उलटल्याने पुन्हा विद्यार्थ्यांना धोका पत्करावा लागला. कधी स्पीड ब्रेकरमुळे, कधी चिखलामुळे, कधी पाणी साचल्यामुळे शाळेपर्यंत पोहोचणे म्हणजे मोठी सर्कस करणे विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या परंतु प्रतिष्ठित अशा शाळांच्या समोरील रस्त्याचीही हीच परिस्थिती आहे. शाळा प्राचार्यांकडे चौकशी करता ग्राम पंचायतीने परवानगी दिली नाही, असे उत्तर मिळते. ग्राम पंचायत पीडीओकडे चौकशी केल्यास पत्रकारांवरच डाफरले जाते. फोन बंद करण्यात येतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत, असे म्हणत म्हणत त्यांचे भविष्य अधांतरी करण्यामध्ये प्रशासनासह सर्वच अधिकारी आणि समाजही जबाबदार आहे. दुर्दैवाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना आहेत. परंतु शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणीच लढत नाही. पालकांना सर्व गैरसोयी आणि अडचणी समजतात. परंतु आपण आवाज उठविला तर आपल्या मुलांवर शाळेचा रोष येईल म्हणून पालक गप्प बसतात. पालक संघटनाही अस्तित्वात नाहीत. एकूणच या शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे आणि ते बिचारे जो हाकतो त्याच्याकडून हाकून घेत आहेत.









