कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी आंदोलक मागण्यांवर ठाम : ‘आयएमए’ने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ 7 प्रशिक्षणार्थी डॉक्टर 6 ऑक्टोबरपासून उपोषणावर आहेत. गुऊवारी रात्री प्रशिक्षणार्थी डॉक्टर अनिकेत महातो यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 5 डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे आरजी कर रुग्णालयातील क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) प्रभारी डॉ. सोमा मुखोपाध्याय यांनी सांगितले.
डॉ. अनिकेत महातो यांना बेशुद्ध अवस्थेत ऊग्णालयात आणण्यात आले होते. त्यांनी उपोषणाला बसल्यापासून गेल्या काही दिवसांपासून पाणीही सेवन केले नव्हते. आणखी 6 कनिष्ठ डॉक्टरांची प्रकृतीही खालावली आहे. गरज लक्षात घेऊन आम्ही सर्व उपकरणे तयार ठेवली आहेत, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम असून उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात डॉक्टरांच्या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करावी, शांततापूर्ण वातावरण आणि सुरक्षा ही चैन नाही, असे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.
8 ऑगस्टच्या रात्री आरजी कर हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी पीडितेचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आढळून आला होता. दुसऱ्या दिवसापासून कनिष्ठ डॉक्टरांनी 42 दिवस कामबंद आंदोलन केले. राज्य सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी 5 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून उपोषण सुरू केले. या आंदोलनात 9 डॉक्टरांचा सहभाग असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे.









