मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : स्मार्ट सिटी अंतर्गत खर्च करण्यात आलेला कोट्यावधीचा निधी गेला पाण्यात
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर पडावी आणि रस्ते फुलून दिसावेत, यासाठी शहरातील विविध मार्गांवर रोपांच्या कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र देखभालीअभावी या कुंड्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत खर्च करण्यात आलेला निधीदेखील पाण्यात गेला आहे. रोपे सुकून गेली असून रस्त्याच्या दुतर्फा केवळ कुंड्याच शिल्लक राहिल्या आहेत. याकडे मनपा प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. रस्ते हिरवाईने फुलावेत आणि पर्यावरणाला चालना मिळावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा या कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र काही महिन्यातच या कुंड्यांची दुर्दशा झाली आहे. पाण्याअभावी कुंड्यांतील रोपे नष्ट झाली आहेत. शिवाय कुंड्यांमध्ये आता रोपांऐवजी तण वाढले आहे. त्यामुळे सौंदर्यिकरणासाठी उभारलेल्या कुंड्यांमुळेच आता शहराला बाधा जावू लागली आहे.
या कुंड्यांमध्ये स्थानिक नागरिक कचरा टाकू लागले आहेत. त्यामुळे कुंड्यांची दुर्दशा झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून श्रीनगर, अंजनेयनगर, शिवबसवनगर आदी ठिकाणी 700 हून अधिक कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. या कुंड्यांतील रोपे नष्ट झाली असून केवळ कुंड्याच शिल्लक राहिल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 43 कोटी रुपयांचा निधी या कुंड्यांसाठी खर्च करण्यात आला होता. मात्र हा सर्व निधी वाया गेला आहे. सौंदर्य तर बाजुला राहिलेच कुंड्या कचराकुंड्या बनू लागल्या आहेत. संगोळ्ळी रायण्णा सर्कल, मनपा कार्यालयाकडे जाणारा रस्ता, धर्मनाथ भवन, श्रीनगर, टिळकवाडी, अशोकनगर, केपीटीसीएल रस्ता आदी ठिकाणी रोप कुंड्यांची दुर्दशा झाली आहे. देखभालीअभावी कुंड्यांतून कचरा वाढला आहे. तर काही ठिकाणी कुंड्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का? हेच आता पाहावे लागणार आहे.









