देखभालीकडे मनपाचे दुर्लक्ष : 700 हून अधिक रोपकुंड्यांची दुर्दशा : खर्च केलेला निधी पाण्यात, दुभाजकांच्या सौंदर्याला बाधा
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून उभारण्यात आलेल्या रोपकुंड्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे शहराबरोबरच रस्त्यांच्या शोभेला बाधा होऊ लागली आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुंड्यांची अवस्था बिकट बनली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’याप्रमाणे सुरुवातीच्या काही वर्षांतच रोपकुंड्यांची अवस्था दयनीय बनली आहे. रस्ते हिरवाईने फुलावेत यासाठी शहरातील विविध मार्गांवर रोपकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र काही महिन्यांतच या कुंड्यांची अवस्था गंभीर बनली आहे. कुंड्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्याने कुंड्यांमधील रोपे नष्ट झाली आहेत. केवळ रस्त्यावर पुंड्याच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे शहरातील स्मार्ट रस्त्यांवर रोपकुंड्यांची दुर्दशा झाल्याचे पहावयास मिळत आहे. शहरातील श्रीनगर, अंजनेयनगर, शिवबसवनगर, धर्मनाथ सर्कल आदी ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा या कुंड्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र पाण्याअभावी कुंड्यांतील रोपे पूर्णपणे सुकून गेली आहेत. त्यामुळे रोपाविना केवळ कुंड्या शिल्लक राहिल्या आहेत.
तब्बल 43 कोटींचा निधी खर्च
शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी संगोळ्ळी रायण्णा सर्कल, धर्मनाथ भवन, टिळकवाडी, अशोकनगर, केपीटीसीएल रस्त्यावर असलेल्या रोपकुंड्यांची अवस्था दयनीय बनली आहे. देखभालीअभावी कुंड्यांतून कचरा वाढला असून काही कुंड्या मोडकळीस आल्या आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल 43 कोटींचा निधी या विकासकामांसाठी खर्ची घालण्यात आला होता. मात्र हा निधी देखभालीअभावी वाया गेला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या 700 हून अधिक रोपकुंड्यांची अवस्था बिकट बनली आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का? हेच आता पहावे लागणार आहे.
सौंदर्य वाढविणाऱ्या दुभाजकांनाच बाधा
शहरातील धर्मनाथ भवन, केपीटीसीएल रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्यांवरील दुभाजकांची अवस्था बिकट बनली आहे. दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे नष्ट झाली असून कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे सौंदर्य वाढविणाऱ्या दुभाजकांनाच बाधा पोहोचली आहे.
सायकल ट्रॅक बनले वाहनतळ
शहरात सायकलस्वारांसाठी बनविण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे सायकल ट्रॅक वाहनतळ बनू लागले आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर वाहने आणि विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक झाकोळला गेला आहे.









