हिंडलगा/वार्ताहर
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित किल्ले श्री विसापूर, किल्ले श्री लोहगड, किल्ले श्री कोरीगड, किल्ले श्री तिकोना गडकोट मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवमूर्तीसमोर महाआरती करून या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते पुणे जिह्यातील लोणावळा जवळ असलेल्या विसापूर गडाच्या पायथ्याला पोहोचले. गड चढण्यास करण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत या गडावर सर्व कार्यकर्ते पोहोचले. नंतर जवळच असलेला व लोहासारखा मजबूत असलेल्या लोहगडावर चढून तेथील सर्व माहिती घेतली. येथील प्रसिद्ध विंचूकडा, लक्ष्मी कोठी आणि महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन पुढील मोहिमेला रवाना झाले.
यंदा 50 हून अधिक कार्यकर्ते व शिवप्रेमींचा सहभाग
दुसऱया दिवशी सवाष्णी घाटातील कोराईगडावर (कोरीगड) पोहोचले. येथील सर्व स्थळांची माहिती घेऊन पुढील तिकोना किल्ल्यावर पोहोचले. अशा या ऐतिहासिक गडकोटांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभा केलं ते याच गडकोटांच्या साथीने. हे गडकोट म्हणजे स्वराज्यलक्ष्मी असे उद्गार खुद्द शिवरायांचे होते. शिवरायांचा हा इतिहास आजच्या पिढीला समजला पाहिजे. हा उद्देश डोळय़ासमोर ठेवून दरवषी 4 गडांना भेट देण्याचे कार्य मंडळाने सुरू ठेवले आहे. आत्तापर्यंत रायगड, प्रतापगड, राजगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी, कलानंदीगड, पारगड अशी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आहे. या वषीच्या मोहिमेत 50 हून अधिक कार्यकर्ते व शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.









