देवस्थान महाजन – भंडारी समाजाची बैठक : ‘हाय व्होल्टेज’ बैठकीत चार ठराव संमत,असभ्य वर्तन करणाऱ्यांविरुद्धचे खटले सुरुच
डिचोली : हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थान समिती आणि वरचे हरवळे येथील श्री सातेरी देवस्थान समिती यांच्यात पालखीच्या वेळी झालेल्या वादावर उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी काढलेला तोडगा अमान्य ठरवत त्या तडजोडीचे इतिवृतांत श्री रूद्रेश्वर देवस्थानचे महाजन व भंडारी समाजाच्या प्रतिनिधींनी फेटाळले आहे. तडजोड आम्हाला मान्य नाही, असा ठराव काल गुरुवारी हरवळे येथे झालेल्या महत्त्वपूर्ण तातडीच्या ‘हाय व्होल्टेज’ बैठकीत घेण्यात आला. याशिवाय बैठकीत चार महत्त्वाचे ठराव घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर देवस्थान समिती व महाजनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे सचिव सुभाष किनळकर यांनी माहिती दिली. यावेळी अध्यक्ष यशवंत माडकर, सचिव संगेश कुंडईकर, उपाध्यक्ष दीपक नाईक, वासुदेव गावकर, उपेंद्र गावकर, काशिनाथ मयेकर व इतरांची उपस्थिती होती.
‘त्या’ तक्रारी मागे घ्यायच्या नाहीत
गेल्या 7 एप्रिल रोजी झालेल्या पालखी सोहळ्यावेळी गोंधळ माजवून काहींनी असभ्य वर्तन केले होते. विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला व युवतींना शिविगाळ करीत त्यांच्याशीही असभ्य वर्तन केले. पालखीवर माती, दगड मारले. मंदिराच्या परिसरात हातात दंडुके घेऊन सदर लोक आले होते. हे सर्व प्रकार असंवेदनशील आहेत. तसेच गुन्हेगारी वृत्ती दर्शवणारे असल्याने त्यांच्या विरोधात देवस्थान समितीतर्फे सादर करण्यात आलेल्या तक्रारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेतल्या जाणार नाहीत. उलट त्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे पोलिसांना किंवा न्यायालयाला देऊन सदर तक्रारी व खटले अधिक मजबूत केले जाणार आहेत, असे ठरविण्यात आले आहे.
बाराही तालुक्यांमध्ये सल्लागार समिती
हरवळेतील श्री ऊद्रेश्वर देवस्थानच्या स्विकृत समितीच्या यापुढील निर्णयांमध्ये सहभागी होऊन देवस्थानची सर्व कामे सर्वानुमते सुरळीत व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच जणांच्या सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यापुढील सर्व निर्णय देवस्थान समिती व या सल्लागार समित्यांच्या संलग्नितपणाने होणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
वरचे हरवळेतील तीनही गटांना मान
हरवळे येथील श्री रूद्रेश्वर मंदिरात दरवर्षी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवात पूर्वपरंपरेनुसार चालत आलेले मान व हक्क वरचे हरवळे येथील सातेरकर, केळबाईकर व जोगसकर या तीनही गटांना मिळणार आहते. परंतु रूद्रेश्वर देवस्थान हे भंडारी समाजाचेच असल्याने इतर सर्व हक्क व अधिकार या समितीकडे राहणार आहेत.
नारळाचा पहिला मान अध्यक्षानाच
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या रथोत्सवात सर्वप्रथम रथावर श्रीफळ केवळ देवस्थान समितीच्या अध्यक्षाकडूनच वाहिले जाणार आहे, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे, असेही सुभाष किनळकर यांनी सांगितले.
गोवाभरातील भंडारी बांधवांचा महाजन यादीत समावेश
या देवस्थानचे प्रकरण न्यायालयात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी यांनी महाजनांची यादी तयार करावी. 2017 मध्ये हा आदेश झाला होता. पण आम्हाला व प्रशासनालाही सदर उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी सापडत नाहीत. सदर पदच नाही. त्यामुळे लवकरात लवकर या विषयी पाठपुरावा करून देवस्थान समितीचे अध्यक्ष व इतर 77 जणांनी सादर केलेल्या खटल्याप्रमाणे गोवाभरातील भंडारी समाजाच्या बांधवांना महाजन करून घ्यावे. त्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला होता. परंतु त्यावर काहीच न झाल्याने आता या विषयाला गती देण्यात यावी. समाजातील लोकांना महाजन करून घेतल्यानंतर या देवस्थान समितीसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येणार व नवीन समिती निवडली जाणार आहे, असाही ठराव घेण्यात आला.
गेल्या महाशिवरात्री उत्सव व नंतर 7 एप्रिलच्या पालखी उत्सवात झालेला गोंधळ ताजा असल्याने संपूर्ण गोवाभरातील भंडारी समाजाच्या लोकांकडून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अचानकपणे देवस्थान समिती व सातेरकर गट यांच्यात समोपचाराने समेट होऊन तडजोड झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच भंडारी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस निर्माण झाली. त्यामुळे या तडजोडीच्या निर्णयाबाबत देवस्थान समितीला जाब विचारण्याची तयारी अनेकांनी केली होती. त्यासाठीच काल गुरू. दि. 11 रोजीच्या बैठकीला वेगळेच महत्त्व होते. ही बैठक वादळी होण्याची शक्यता होती. पालखी सोहळ्यात उडालेला गोंधळ, महिलांशी करण्यात आलेले असभ्य वर्तन, लोकांवर मारण्यात आलेल्या खुर्च्या व माती दगड या प्रकरणाला जबाबदार असलेल्या लोकांबरोबर कशाप्रकारे तडजोड करू शकतात. असा सवाल सर्वत्र उपस्थित झाला होता. त्यानुसार या बैठकीला संपूर्ण गोव्यातील मोठ्या संख्येने भंडारी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.