अभिजित संयुक्तपणे अग्रस्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर अभिजित गुप्ताला आर्मेनियाच्या मॅन्युएल पेट्रोस्यानने बरोबरीत रोखले, परंतु अभिजितने आठव्या फेरीनंतर आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
दुसरीकडे, बेलारूसच्या ग्रँडमास्टर मिहेल निकितेंकोने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर लुका पैचाडझे याला पराभूत करून गुप्तासोबत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ‘अ’ श्रेणीमध्ये फक्त दोन फेऱ्या शिल्लक असताना निकितेंको आणि गुप्ता प्रत्येकी सात गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहेत. तीन वेळचा माजी विजेता गुप्ताने आर्मेनियन ग्रँडमास्टर पेट्रोस्यानशी झुंज दिली आणि त्याच्या गुणांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी वारंवार आक्रमण केले, परंतु शेवटी सामना बरोबरीत सुटला आणि त्यांच्या गुणांमध्ये अर्धा गुण जोडला गेला.
स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित खेळाडू ग्रँडमास्टर एस. एल. नारायणने भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर नीलाश साहा याच्याशी बरोबरी साधली. यामुळे हे दोन्ही अव्वल स्थानावरील खेळाडूंच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. भारतीय इंटरनॅशनल मास्टर आरोण्यक घोष आणि स्वीडिश ग्रँडमास्टर विटाली सिवुक यांनीही बरोबरी साधली, तर दिप्तयन घोषने रशियाच्या बोरिस सावचेन्कोचा पराभव केला. तिघांचेही साडेसहा गुण झालेले आहेत.
पुढे मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्यांमध्ये ग्रँडमास्टर आदित्य सामंत, मामिकोन घारिब्यान (आर्मेनिया) आणि आलेक्सेज अलेक्सांड्रोव्ह (बेलारूस) यांचा समावेश असून त्यांनी आठव्या फेरीत आपापले सामने जिंकले. ग्रँडमस्टर वेंकटरमन कार्तिक, गुयेन डॉक होआ (व्हिएतनाम) आणि एम. आर. वेंकटेश यांनीही विजय मिळवले, परंतु गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्यांपासून ते एक किंवा त्याहून अधिक गुणांनी मागे आहेत.









